नालासोपारा : विरारच्या म्हाडा वसाहतीतील एका इमारतीमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात नालासोपारा अनैतिक मानवी वाहतूक शाखेच्या पोलिसांना यश आले. यामध्ये एक अल्पवयीन तर दोन २३ वर्षीय पीडित बांगलादेशी मुलींची सुटका केली आहे. या प्रकरणी एका बांगलादेशीला अटक केली असून, त्याच्या दोन फरार साथीदारांचा शोध सुरू आहे.
विरार पश्चिमेला ही म्हाडाची मोठी वसाहत आहे. यातील डी- ७ इमारतीच्या सदनिका क्रमांक २१०४ मध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक शाखेला मिळाली होती.
गुन्हा दाखल
शुक्रवारी रात्री पोलिसांच्या पथकाने छापा घालून या फ्लॅटमधून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची सुटका केली. अन्य दोन मुलींची प्रगतीनगरमधून सुटका केली. या प्रकरणी अर्नाळा पोलिस ठाण्यात वेगवेगळ्या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असे चालत होते रॅकेट
या सेक्स रॅकेट टोळीचा सूत्रधार आरोपी अशोक दास (५४) असून, तो बांगलादेशी आहे. तो साथीदारांच्या मदतीने बांगलादेशातून बेकायदेशीरपणे अल्पवयीन मुली आणि तरुणींना फसवून देहव्यापारासाठी मुंबईत आणत होता. मुली आणल्यानंतर तो या फ्लॅटमध्ये ठेवायचा. त्यानंतर, या मुलींना मुंबईच्या ग्रॅंट रोड येथील रेड लाइट एरियामध्ये देहव्यापारासाठी पाठवत होता.
या सेक्स रॅकेट टोळीचा सूत्रधार आरोपी अशोक दास (५४) याला अटक केली आहे. त्याच्या दोन फरार साथीदारांचा शोध सुरू आहे. मागील दोन वर्षांत त्यांनी ३०० हून अधिक बांगलादेशी मुलींना फसवून मुंबईत देहव्यापारासाठी आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
- संतोष चौधरी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अनैतिक मानवी वाहतूक शाखा.