नालासोपारा (मंगेश कराळे) :- पोलीस अकादमीत मुलींचे लैगिक शोषण प्रकरणातील दोन्ही आरोपी पोलीस अकादमीत काम किंवा कसे चालवायचे असा प्रश्न वसईतील नागरिकांना पडला आहे. या दोन्ही पोलिसांना वरिष्ठ रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांचे अभय होते का असा सवाल सामान्य नागरिकांना आता पडला आहे. या दोन्ही आरोपी पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.
पोलीस खात्यात सेवेत असताना किंवा निलंबित असताना उपजीविकेसाठी कोणताही व्यवसाय करू शकत नाही. पण नालासोपारा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी समाधान गावडे (२८) आणि त्याची २५ वर्षीय पोलीस मैत्रीण रेल्वे पोलीस म्हणून कार्यरत असताना पोलीस भरती प्रशिक्षणाचे क्लासेस कसे चालवायचे. याबाबत वरिष्ठांना दोघांनी कळविले होते का ? वरिष्ठांनी त्यांच्याकडून लेखी खुलासा घेतला होता का ? गावडे हा नालासोपारा येथे विजयी भव नावाची पोलीस अकादमी चालवयाचा असे कळते.
शहरात स्वतःचे गणवेशातील मोठे फोटो टाकून रेल्वे स्थानकाच्या परिसरात बॅनरबाजी केलेली आहे. वरिष्ठांना याबाबतीत काही महित नव्हते की अर्थपूर्ण पाठींबा देऊन डोळेझाक तर केले नव्हते असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. जर हे दोघे पोलीस सेवा करत होते तर दुर्गम भागातून येणाऱ्या व पोलीस होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या मुलामुलींना पोलीस भरती प्रशिक्षण केव्हा द्यायचे हाही महत्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे.
रेल्वेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे मौन ?
वसई रेल्वे पोलीस ठाण्यातील दोन आरोपी पोलिसांवर विनयभंग, पोक्सो तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत नालासोपाऱ्यात गुन्हा दाखल झाला आणि पोलीस खात्यात खळबळ माजली. याप्रकरणी रेल्वेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन इंगवले यांना गुरुवारपासून संपर्क साधून त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. शुक्रवारी पोलीस ठाण्यात भेटण्यासाठी गेल्यावर बोरिवली येथे गेल्याचे कळले. एकूणच याप्रकरणी इंगवले यांनी मौन बाळगून मोबाईल न उचलण्याचा विडाच उचलला आहे. त्यांचा या दोन्ही पोलिसांना पोलीस भरती प्रशिक्षणाचे क्लासेस घेण्यासाठी पाठींबा होता की काय याचा अद्याप उलगडा झालेला नाही.