वाडा : शहरातील उमरोठे रोड या भागात जल विज्ञान प्रकल्पाचे उपविभागीय कार्यालय असून ते अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. असुविधा व दुर्लक्षामुळे ते ओस पडलेले आहे. येथे असलेल्या १० पदांपैकी जेमतेम १ महिला कर्मचारी कार्यालयात उपस्थित असून अन्य कर्मचारी विविध कारणांनी बाहेर गेले असल्याचे येथील अभियंत्यांनी सांगितले.पडणाऱ्या पावसाचे प्रमाण व नद्यांतून वाहणारे पाणी यांचे मापन कारण्यासाठी जल विज्ञान प्रकल्पाचे वाडा येथे उपविभागीय कार्यालय आहे. वाडा शहरातील उमरोठे रोड या भागात निवांत जागी हे कार्यालय भल्यामोठ्या जागेत आहे. मात्र हे कार्यालय अगदी बोटावर मोजणाºया लोकांना ठाऊक असून हे कार्यालय अगदी बेदखल असल्याचे जाणवते. कार्यालयात उप विभागीय अधिकारी, ज्युनिअर व सिनिअर लिपिक, कनिष्ठ व शाखा अभियंते, शिपाई तसेच तंत्रज्ञ अशी १० पदे आहेत.या कार्यालयात अधिकाºयांना भेटायला आम्ही गेलो तेव्हा या ठिकाणी ज्युनिअर लिपिक या महिला कर्मचारी उपस्थित होत्या बाकी कार्यालय ओस पडलेले पाहायला मिळाले. अन्य एका कर्मचाºयांना फोन वर माहिती विचारली असता कार्यलायतील संगणकाची चोरी झाल्याने ते आॅनलाइन कामासाठी घरी गेल्याचे त्यांनी सांगितले व अन्य अधिकारी कार्यालयीन कामासाठी बाहेर गेल्याचे सांगून सारवासारव केली. एकंदर अतिशय दुर्लक्षित असलेल्या या विभागात आओेजाओ घर तुम्हारा अशी अवस्था असल्याचा आरोप केला जात आहे. या कार्यालयात पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने व त्यामुळे शौचालयाचा प्रश्नच येत नसल्याने कर्मचाºयांची विशेषत: महिला कर्मचाºयाची कुचंबणा होते.सर्वत्र घाण, कचरा या कार्यालयाचा उपयोग काय?कार्यालयाला गवताचा व घाणीचा घेराव असून त्याची साफसफाई करण्याची कसलीही तरतूद या कार्यालयात नाही.तसेच वारंवार मागणी करूनही या सगळ्या समस्यांवर काहीच मार्ग निघत नसल्याचे येथील उपस्थित असलेले कर्मचारी सांगतात.खरं तर जल विज्ञान प्रकल्प हे कार्यालय नेमके काय व किती काम करते तसेच त्याचा शासनाला किती फायदा होतो हा संशोधनाचा विषय असून सरकारी कार्यालयात असलेला शुकशुकाट व मनमानी कारभाराला तात्काळ चाप बसावी यासाठी या कार्यालयाची व येथील एकंदर गोंधळाच्या प्रकाराची चौकशी व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गोतारणे यांनी केली आहे.
वाडा जलविज्ञानमध्ये शुकशुकाट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 2:27 AM