नालासोपारा : रविवारी रात्री मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील बाफाणे गावाच्या हद्दीत गोणीमध्ये हत्या करून भरलेला मृतदेह सापडला होता. वालीव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास करत ३६ तासांच्या आत ओळख पटवून अपघाताचा केलेला बनाव उघड करून पैशांच्या वादातून झालेल्या हत्येचा छडा लावून चार आरोपींना अटक केली आहे.
वालीव पोलिसांनी या प्रकरणी तीन टीम तयार केल्या होत्या. वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई, ठाणे, भिवंडी, मीरा-भाईंदर वसई-विरार आयुक्तालय या परिसरातील मिसिंग, अपहरण असलेल्यांचा शोध घेत कौशल्याने तपास करून कांदिवली पूर्व येथे राहणारे पारस गुप्ता (४५) हे मिसिंग असल्याचे समतानगर पोलीस ठाण्यात नोंद असल्याची माहिती वालीव पोलिसांना मिळाली. त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क केल्यावर हत्या झालेले पारस गुप्ता असल्याचे निष्पन्न झाले. ओळख निष्पन्न झाल्यावर या गुन्ह्याचा तांत्रिकदृष्ट्या व गुप्त माहितीदाराच्या आधारे तपास करत कांदिवलीतून ओमप्रकाश अंजारीरामजी बिष्णोई (२१), सुरेशकुमार कृष्णाराम बिष्णोई (२१), सुरेशकुमार नारायणराम बिष्णोई (२५) आणि भवरलाल चेनाराम बिष्णोई (३८) यांना बुधवारी अटक करण्यात आली. गुप्ता यांच्याकडून ओमप्रकाश याला भंगाराच्या उधारीचे पैसे घेणे बाकी असल्याने झालेल्या वादातून लाकडी दांडग्याने डोक्यात व मानेवर मारून ठार मारले. हत्या केल्यानंतर पोलिसांची व लोकांची दिशाभूल करण्यासाठी बाजूला पडलेले केमिकल आजूबाजूला टाकून घटनेवेळी अपघात झाल्याचा बनाव उघड केला. ही घटना लपवण्यासाठी चारही आरोपींनी आपसात संगनमत करून मृतदेह गोणीमध्ये भरून स्वतःच्या इको चारचाकी गाडीत भरून बाफाणे येथे फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे करत आहेत.
हत्या केल्यावर मृतदेह गोणीमध्ये भरून फेकलेला सापडल्यावर गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात चार आरोपींना अटक केली असून वसई न्यायालयात हजर केल्यावर सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.- विलास चौगुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वालीव पोलीस ठाणे