शशिकांत ठाकूर
कासा : पालघर जिल्ह्याच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरलेला सूर्या प्रकल्प शहरांची तहान भागवत आहे, मात्र या प्रकल्पापासून जवळ असलेल्या सोमटा परिसरातील अनेक गावे सूर्या प्रकल्पाच्या पाण्याच्या प्रतीक्षेत असून आजही अनेक गावांना पाणी मिळालेले नाही. दरम्यान, या गावांना पाणी मिळण्यासाठी पाच वर्षांपूर्वी तत्कालीन खासदार चिंतामण वनगा यांनीही प्रयत्न केले होते, तसेच सोमवारपासून तवा येथे शेकडो शेतकरी प्रकल्पाच्या पाण्यासाठी उपोषणाला बसले आहेत, परंतु त्याची प्रशासनाने अद्याप दखल घेतलेली नाही. यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीची भावना व्यक्त होत आहे.सूर्या प्रकल्पाच्या कालव्यांतर्गत डहाणू, पालघर व विक्रमगडमधील काही गावांना उन्हाळ्यात शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. या कालव्यांतर्गत मिळणाऱ्या पाण्यातून या परिसरात मोठ्या प्रमाणात भातशेती व भाजीपाला लागवड शेतकरी करतात. त्यामुळे येथील लोकांना रोजगारासाठी बाहेर जावे लागत नाही.
दुबार पिकामुळे शेतकऱ्यांनाही उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेता येते, मात्र सूर्या प्रकल्पापासून अवघ्या १२ ते १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या सोमटा परिसरातील विक्रमगड तालुक्यातील करसोड, कोंडगाव, वेडे, घाणेडा, विलशेत, भोपोली, चिंचघर, पाचमाड अशा दहा ते बारा गावांतील शेतकरी वारंवार मागणी करूनही अद्यापही सूर्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. या भागातील आदिवासी शेतकरी उन्हाळ्यात विहीर, मोटारपंप, ओहळ, नाल्यातील व इतर पाण्याच्या साह्याने भाजीपाला लागवड करतात. मात्र त्यांना पाणी कमी पडत असल्याने अनेक शेतकऱ्यांना आपली शेती करता येत नाही. याची दखल घेत २०१६ साली माजी खासदार चिंतामण वनगा यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे सूर्या धरणाचे पाणी कालव्यातून या गावांतील शेतकऱ्यांना शेतीसाठी देण्याची मागणी केली होती, मात्र अद्यापही शेतकऱ्यांना सूर्या कालव्याचे पाणी मिळालेले नाही. मात्र आता कवडास धरणाची उंची वाढविण्याचे काम सुरू असून पाइपद्वारे सूर्या प्रकल्पाचे पाणी मीरा-भाईंदर क्षेत्राकडे नेले जाणार आहे. त्यामुळे सोमटा परिसरातील गावांतील शेतकऱ्यांनी कालव्यांतर्गत शेतीसाठी आम्हाला पहिले पाणी मिळावे, अशी मागणी केली आहे. दरम्यान, मीरा-भाईंदरकडे पाणी देण्यासाठी या परिसरातील शेतकऱ्याने विरोध दर्शवला असून या व इतर काही मागण्या घेऊन सोमवारपासून तवा येथे शेकडो शेतकरी उपोषणालाही बसले आहेत.
आंदोलनाला शेकडो शेतकऱ्यांचे समर्थन सूर्या धरणाचे पाणी शेतीसाठी प्राधान्याने दिले पाहिजे, लाभक्षेत्रातील प्रत्येक गावाला पिण्याचे पाणी घरोघरी मिळाले पाहिजे, स्थानिक ग्रामसभा वनहक्क समित्या यांच्या ठरावाला न्याय सन्मान मिळाला पाहिजे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे असून आपल्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी समर्थन दिले आहे.