पारोळ : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने तानसा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना धोका निर्माण झाला आहे. या नदीवरील मेढे आणि पांढरतारा पूल पाण्याखाली गेल्याने वसई पूर्वेकडील १२ गावांचा संपर्क तुटला आहे. या पावसाळ्यात पहिल्यांदाच हे पूल पाण्याखाली गेले आहेत.
दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाने वसई-विरार शहरांसह वसईच्या ग्रामीण भागाला अक्षरश: झोडपून काढले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे दोन्ही पूल पाण्याखाली गेले आहेत. तानसा नदीच्या पात्राने अद्याप धोक्याची पातळी सोडलेली नाही. मात्र, नदीकिनारी किंवा ज्या सखल भागांत मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे, नागरिकांना तेथे जाण्यास मनाई करण्यात आली आहे.वसई पूर्व परिसरातून वाहणाऱ्या तानसा नदीचे पात्र बुधवारी दुथडी भरून वाहत होते. नदीवर असलेल्या मेढे व पांढरतारा पूल पाण्याखाली गेल्याने भाताणे, नवसई, आडणे, भिनार, आंबिडे मेढे, वडघर, कळभोंण लेंडी, थळ्याचापाडा, हत्तीपाडा या गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक वर्षांपासून या दोन या पुलांची उंची वाढवण्याची मागणी नागरिक करत आहेत. मात्र, त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलेले आहे. तर, मेढे येथे तानसा नदीवर नवीन पुलाच्या कामाचा दोन वेळा नारळ फुटूनही दोन वर्षांपासून या नवीन पुलाचे काम बंद आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना जुन्या पुलावरून प्रवास करावा लागत आहे.