लोकमत न्यूज नेटवर्ककिन्हवली : आदिवासीबहुल असलेल्या शेणवा भागात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधांअभावी रुग्णांचे हाल होत आहेत. केवळ दोनच डॉक्टर असल्यामुळे २४ तास सेवा देण्यात अडचणी येत आहेत. आरोग्य केंद्राची इमारतही जुनी आणि अपुरी पडत नव्या इमारतीची गरज आहे. पुरेसा निधीही मिळत नसल्याने आरोग्यसेवेचा बोजवारा उडालेला दिसत आहे.तालुक्यात नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या परिसरात ३३ हजार लोकसंख्या असून ३६ अंगणवाड्या आणि तीन मिनी अंगणवाड्या आहेत. १९ गावे आणि १७ आदिवासीवाड्या या केंद्रांतर्गत येतात. तसेच वेहलोली बु., मळेगाव, शेणवा, धसई, सापगाव हे पाच उपआरोग्य केंदे्र आहेत. वैद्यकीय अधिकारी दत्तात्रेय धरणे आणि प्रशांत कनोजे या दोघांसह १६ कर्मचारी येथे कार्यरत आहेत.शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत १९९२ मध्ये बांधण्यात आली आहे. आतापर्यंत केवळ दुरु स्ती करून हे प्राथमिक आरोग्य केंद्र चालवले जात असल्याने येथील रुग्णांना पुरेशा सोयीसुविधा मिळत नसल्याने यासाठी सुसज्ज इमारतीची आवश्यकता आहे. मात्र, आरोग्य केंद्रासाठी संपादित जागा शासनाच्या नावावर झालेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन वैद्यकीय अधिकारीपदे याठिकाणी मंजूर असल्याने २४ तास रु ग्णसेवा देण्यासाठी त्यांच्यावर ताण येत असल्याने याठिकाणी तीन वैद्यकीय अधिकारीपदांची आवश्यकता आहे. त्यांच्यासोबत नर्स आणि शिपाई असणे आवश्यक आहे. सुविधा मिळत नसल्याने अनेक रु ग्ण खाजगी दवाखान्यांत जात असून मोठ्या आजाराच्या उपचारासाठी ३० किमी अंतरावरील शहापूरला जावे लागते.ठाणे जिल्हा परिषदेने मंजूर करून बांधलेले कॅन्टीन अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे येथील रु ग्णांना आहार मिळत नाही. प्रसूतीसाठी केवळ सहा बेडच असल्याने मोठी गैरसोय होत आहे. शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रातील पाच उपकेंद्रांत डॉक्टर हे पद मंजूर नसल्याने एएनएममार्फत प्रथमोपचार केले जात आहेत. सर्प व विंचूदंशावर उपचारासाठी शेणवा प्राथमिक केंद्र गाठावे लागत आहे.यासाठी उपकेंद्रांत डॉक्टर उपलब्ध करून देणे आवश्यक असून एएनएम व आरोग्यसेवक वेळेवर उपस्थित राहणे गरजेचे आहे. १८ मंजूर पदांपैकी वाहनचालक आणि शिपाई हे पद आजही रिक्त असल्याने त्याचा ताण येऊ न कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्याच्या कामावर परिणाम होताना दिसत आहे.येथील सोलरव्यवस्था बंद असून सामाजिक संस्थेच्या माध्यमातून यापूर्वी दिलेल्या बॅटरीही बंद झाली आहे. त्यामुळे अनेकदा विजेची समस्या निर्माण होत आहे. आरोग्य केंद्राच्या परिसरात पाच अतितीव्र कुपोषित (सॅम) आणि ४२ मध्यम तीव्र कुपोषित (मॅम) बालके आढळून आली आहेत.
शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्र नव्या इमारतीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 11:21 PM