नालासोपारा - वसईतील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर (वसई गाव) परिसरात शिलाहारकालीन गद्धेगाळ शिळा रविवारी सकाळी सापडल्या आहेत. गेल्या कित्येक वर्षांत ऊन, पाऊस, वारा या नैसर्गिक प्रभावात शेवाळ, माती, चिखल साचून पूर्णपणे दुर्लक्षित शिळा अंतिम घटकेत नामशेष होण्याच्या मार्गावर होत्या. यावर मंगलकलश, कोरीव शिवलिंग, गध्येगाळ प्रतिमा सहा ओळींचा शिलालेख आदी आढळून आले आहे.किल्ले वसई मोहीम अंतर्गत गेली १८ वर्षे सातत्याने दुर्ग संवर्धन व इतिहास संकलन मोहीम सुरू आहे. यातील इतिहास संकलन मोहीम अंतर्गत वसईतील ऐतिहासिक स्थळांचे नोंदणीकरण सुरू आहे. याच मोहिमेचे औचित्य साधून श्री सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या आवारातील अप्रसिद्ध शिलालेखाचा प्रथमच वेध घेण्यात आला. यातील जुन्या मराठी देवनागरी शिलालेखाचे वाचन करण्यात आले. या शिलालेखाचा सविस्तर तपशील लवकरच विविध लेखमाला, शासकीय व संशोधन त्रैमासिक माध्यमातून अभ्यासकांपुढे प्रसिद्ध होणार आहे.किल्ले वसई मोहिमेचे इतिहास अभ्यासक डॉ. श्रीदत्त राऊत यांच्या माध्यमातून समस्त किल्ले वसई मोहीम प्रतिनिधींनी रविवारी शिलालेख महाराष्ट्रात प्रथमच उजेडात आणला. सकाळी ८ ते १२ या वेळेत हा दुर्लक्षित शिलालेख व शिळा पुरातत्वीय दृष्टीने स्वच्छता करून संवर्धन केला. जिल्ह्यातील मांडवी, रांजली, आगाशीसोबतच श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरात नवीन शिलालेखाची नोंद करण्यात आली आहे. रविवारच्या मोहिमेत डॉ. श्रीदत्त राऊत, दीपाली पावसकर, प्रशांत सातवी, भरत पाटील, दिव्या राऊत, दुर्वी राऊत, प्रीतम पाटील यांनी सक्रिय योगदान दिले. ऐतिहासिक संदर्भकेशीदेव, अपरादित्य, हरिपालदेव, मल्लीर्जुन, अपरादित्य द्वितीय, सोमेश्वर या ठाणे शिलाहार राजांच्या राजवटीचे उल्लेख कोकणातील आगाशी, भिवंडी इत्यादी ठिकाणी सापडलेल्या शिलालेखांतून मिळतात. उत्तर कोकणात शिलाहारांचे राज्य ४०० वर्षे होते. उत्तर कोकणातील शिलाहारांचा कालावधी इ.स ८०० ते १२६५ असा मानण्यात येतो.
वसईत आढळल्या शिलाहार राजवटीतील शिळा, दुर्लक्ष झाल्याने नामशेष होण्याच्या मार्गावर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 11:53 PM