नालासोपारा : नायगाव येथील रेल्वे पुलाच्या बीम आणि पिलरला शुक्रवारी रात्री एक जहाज धडकल्याने हा पूल रेल्वे वाहतुकीसाठी धोकादायक ठरू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पुलाला धडक दिल्याप्रकरणी माणिकपूर पोलिसांनी शनिवारी दोन जहाज चालक, मालक आणि स्पीड बोटीवरील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास रेल्वे पुलाला जहाजाने धडक देण्याची घटना घडली होती.नायगाव वसई खाडी येथील रेल्वेच्या फास्ट ट्रॅकवरील रेल्वे ब्रिजवरील पोल क्रमांक ४६/६ सी येथे शुक्रवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास अज्ञात आरोपींनी त्यांच्या ताब्यातील दोन जहाजे विनापरवाना आणून ती पुलाखालून जात असताना पुलाला धडक बसली होती. या घटनेनंतर धडक बसलेले जहाज खाडीतील पाण्यात बुडाले आहे. कोणत्याही यंत्रणेची परवानगी न घेताच होत असलेल्या अशा प्रकारच्या वाहतुकीमुळे आगामी काळात पुलाला मोठा धोका संभवत आहे.रेल्वे पुलाच्या सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता निष्काळजीपणे वसई खाडीतून पूर्व दिशेकडून पश्चिम दिशेकडे घेऊन जात असताना लोकल लाइनच्या ब्रिजचे गर्डर (बीम) आणि पिलरला धडकून अपघात झाला होता. या अपघातामध्ये रेल्वे ब्रिजच्या मालमत्तेचे जाणीवपूर्वक नुकसान करून लोकांच्या जीवितास धोका निर्माण करण्यास कारणीभूत झाले. या प्रकरणी रेल्वेचे अधिकारी अनिलकुमार कमलाप्रसाद शुक्ला (४५) यांनी शनिवारी माणिकपूर पोलीस ठाण्यात दोन जहाज चालक, मालक आणि स्पीड बोटीवरील तिघांविरुद्ध वेगवेगळ्या कलमान्वये तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांची कारवाईला सुरुवात मुंबई आणि गुजरात या राज्यांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गावरील हा अत्यंत महत्त्वाचा पूल आहे. मुंबई ते वसई-विरार आणि डहाणूपर्यंतची उपनगरी लोकल सेवा याच मार्गावरून होत असते. तसेच गुजरात, राजस्थान आदी राज्यांसाठी एक्प्रेस गाड्या धावत असतात. यामुळे पुलाला जहाजाची धडक बसल्याने पूल धोकादायक होण्याचीही भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, रेल्वे अधिकाऱ्यांनी या प्रकरणी रीतसर कारवाई सुरू केली आहे.