वाडा : वाडा तालुका शिक्षक सेनेच्यावतीने जव्हार तालुक्यातील किल्ले भूपतगडावर शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. वाडा तालुका शिक्षक सेनेच्यावतीने दरवर्षी शिवजयंतीला विविध गडकिल्ल्यांवर भ्रमंती व स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले जाते. यापूर्वी किल्ले कोहोज, किल्ले माहुली, किल्ले आशेरिगड, किल्ले शिरगाव या किल्ल्यांवर शिक्षक सेनेने भ्रमंती व स्वच्छता मोहीम आयोजिली होती. यावर्षी जव्हार तालुक्यातील किल्ले भूपतगडावर ही मोहीम आयोजित केली होती.
भूपतगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. हा किल्ला एकेकाळी जव्हार संस्थानची राजधानी होती. शिक्षक सेनेच्या ५० कार्यकर्त्यांनी किल्ल्यावरील तलावाची स्वच्छता, तलावाच्या दगडी बांधाची दुरुस्ती करून शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली. या मोहिमेत शिक्षक सेनेचे पालघर जिल्हा संपर्क प्रमुख अविनाश सोनवणे, उपाध्यक्ष नरेश सांबरे, शिक्षक सेनेचे वाडा तालुकाध्यक्ष दिनेश खिलारे, सरचिटणीस हेमंत बोंद्रे, संपर्क प्रमुख अजित चौधरी, कोषाध्यक्ष शांताराम दळवी, प्रसिद्धीप्रमुख देवानंद पाटील आदी सहभागी झाले होते. ही गडकिल्ले स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी शिक्षक सेनेचे जव्हार तालुकाध्यक्ष बाळू तुंबडा, उपाध्यक्ष विलास गावंडा यांनी विशेष मेहनत घेतली.