वसईतील शिवसेना नेते विजय पाटील यांची काँग्रेस पक्षामध्ये घरवापसी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 11:47 PM2021-05-05T23:47:29+5:302021-05-05T23:47:53+5:30
शिवसेनेने हितेंद्र ठाकूर यांच्याविरोधात दिली होती उमेदवारी
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : वसईत २०१९ ला शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक लढविलेले विजय पाटील यांनी मंगळवारी काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे. मंगळवारी संध्याकाळी मुंबईत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे पालघर जिल्ह्यातील निवडक पदाधिकारी व किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पष्ठे आदींच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.
विजय पाटील यांनी शिवबंधन बांधून विधानसभेची निवडणूक लढवली होती. पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे असलेले विजय पाटील हे नंतर बहुजन विकास आघाडी आणि नंतर शिवसेनेमध्ये गेले होते. पालघर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचा उमेदवार म्हणून हा पक्षप्रवेश झाला असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात होत आहे.
पालघर जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती
वसईचे आमदार व बविआ अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्यासमोर शिवसेना उमेदवार म्हणून पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. आता त्यांनी काँग्रेस प्रवेश केल्यानंतर नाना पटोले यांनी त्यांना पालघर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष केले आहे. दरम्यान, काँग्रेसने खासदारकीची उमेदवारी दिली नाही तर विजय पाटील नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार का, अशीही चर्चा वसईकर करीत आहेत.