पालघर : जिल्ह्यातील आठही पंचायत समितीमध्ये सभापती-उपसभापती निवड करताना राज्यातील महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अवलंबला गेल्याने शिवसेना-राष्ट्रवादीने एकूण पाच पंचायत समितीवर आपले वर्चस्व सिद्ध केले. तर दोन ठिकाणी शिवसेना-भाजपला तडजोड करीत सत्ता स्थापन करावी लागली तर अन्य तलासरीमध्ये माकपने आपले एकहाती वर्चस्व सिद्ध केले.
जिल्ह्यातील पालघर, मोखाडा, विक्रमगड, वाडा, डहाणू, जव्हार, तलासरी व वसई अशा आठ पंचायत समितीच्या निवडणुका ७ जानेवारी रोजी पार पडल्या होत्या. ८ जानेवारीला मतमोजणी झाल्यानंतर एकंदरीत सर्व चित्र स्पष्ट झाले होते. मोखाडा पंचायत समितीच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेला पाच तर राष्ट्रवादी पक्षाचा एक उमेदवार निवडून आला होता.वाडा पंचायत समितीच्या १२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना ४, राष्ट्रवादी ४, भाजप २, मनसे एक आणि अपक्ष एक असे सदस्य निवडून आले होते. त्यामुळे सेना-राष्ट्रवादी पक्षाला बहुमत प्राप्त झाले होते.
वसई पंचायत समितीच्या एकूण आठ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना ३, बविआ ३ तर भाजप दोन असे बलाबल झाल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. या वेळी राज्यातील सत्तेच्या बिघडलेल्या संबंधाचा विचार न करता शिवसेना-भाजपने युती करून बहुजन विकास आघाडीला बाजूला सारण्यात यश मिळवले. विक्रमगड पंचायत समितीच्या १० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी चार, भाजपा दोन, शिवसेना एक एक, माकड एक तर दोन अपक्ष असे बलाबल होते. डहाणू पंचायत समितीच्या २६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी ९, शिवसेना ८, भाजप ७, माकपा २ असे बलाबल होते. जव्हार पंचायत समितीच्या ८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप ४, शिवसेना ३ तर माकपा एक असे बलाबल होते.तलासरी पंचायत समितीच्या दहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आठ जागा जिंकल्या तर भाजपने दोन जागा जिंकल्याने माकप तलासरी पंचायत समितीवर एक हाती सत्ता प्रस्थापित केली. त्यामुळे सभापती आणि उपसभापतीपदी माकपच्याच उमेदवारांची बिनविरोध निवड झाली.पालघरचे उपसभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेसलापालघर तालुक्यात ३४ गणांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेला २३, राष्ट्रवादीला २, बविआ ४, भाजप २, मनसे १ व अपक्ष एक असे सदस्य निवडून येत शिवसेनेने एकहाती सत्ता मिळवली होती.सभापती-उपसभापती या दोन्ही जागांवर शिवसेनेचे सदस्य विराजमान होतील, अशी शक्यता होती. मात्र शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार उपसभापती राष्ट्रवादीला सोडण्यात आल्याचे समजते.सभापतीपदासाठी सेनेच्या रंजना म्हसकर यांचा एकमेव अर्ज आला होता तर उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादीचे चेतन पाटील व सेनेचे मुकेश पाटील यांचे अर्ज होते. परंतु मुकेश पाटील यांनी अर्ज मागे घेतला.