- मंगेश कराळे
नालासोपारा :- एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील जवळपास ४० आमदार आणि अपक्ष १० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं आहे. मात्र, अजूनही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणी कमी झालेल्या दिसत नाही. आता वसईतही शिवसेनेला मोठा धक्का बसणार आहे. वसई, नालासोपारा शहरातील शिवसेनेचा मोठा गट येत्या दोन किंवा तीन दिवसांत शिंदे गटात सामील होणार आहे. त्यामुळे वसईत भविष्यात शिवसेनेचे काय हा प्रश्न पडला आहे.
आगामी दोन किंवा तीन दिवसांमध्ये उपजिल्हाप्रमुख, नेतेमंडळी, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, दोन किंवा तीन माजी नगरसेवक, शाखाप्रमुख, पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांचा मोठा गट शिंदे गटात सामील होणार असल्याची माहिती उपजिल्हाप्रमुख नवीन दुबे यांनी लोकमतला दिली. एकूणच मोठा शिवसेनेचा गट शिंदे गटात गेला तर वसईत राजकीय भूकंप होणार आहे. आगामी होणाऱ्या वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला उमेदवार मिळतील की नाही हे पाहावे लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या उपस्थितीत लवकरच सर्व जण जाणार असल्याची माहिती दुबे यांनी दिली. जर असे झाले तर शिवसेनेसाठी हा खूप मोठा झटका बसणार आहे.