वसई: एकीकडे कोरोनाचे संक्रमण त्यात सर्वत्र भीतीचे वातावरण तर दुसरीकडे आर्थिक चणचण अशा दुहेरी संकटात सर्वसामान्य नागरिक असताना महावितरण यांनी सरासरी भरमसाठ बिले पाठवून सर्वसामान्यांना झटका दिला आहे. त्याविरोधात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. उद्या दुपारी १२ वाजता वसई पश्चिम येथील वीज कार्यालयात नागरिकांतर्फे चक्क चड्डी- बनियान घालून एक लेखी निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना उपशहरप्रमुख मिलिंद चव्हाण यांनी लोकमतला दिली.राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचं सरकार असूनदेखील शिवसेनेकडून एक अनोखे आंदोलन करण्यात येणार असल्याने या आंदोलनाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदी जाहीर करण्यात आली. त्यामुळे कित्येक नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या, उद्योगधंदे बुडाले, पगार कपात झाली. या संकट काळातही ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिलं पाठवण्यात येत आहेत.महावितरणकडून सरासरीच्या नावाखाली आर्थिक पिळवणूक सुरू आहे. तिचा पर्दाफाश करण्यासाठी शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातील सरकारमध्ये शिवसेनेचा सहभाग आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री म्हणून सरकारचं नेतृत्त्व करत आहेत. अशा परिस्थितीत शिवसैनिक आंदोलनासाठी उतरणार आहेत. त्यातच हे आंदोलन शिवसेना स्टाईलनं होणार असल्यानं त्याची वसईत मोठी चर्चा आहे.
आपल्याच सरकारविरोधात शिवसैनिक आक्रमक; चड्डी-बनियन घालून देणार निवेदन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 4:01 PM