- हुसेन मेमन, जव्हारजव्हार संस्थांनचा इतिहास सांगताना अभिमानाने उर भरून यावा असा आजचा दिवस ! ३१ डिसेंबर १६६३, पौष शुद्ध व्दितीया या दिवशी छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने जव्हारची भूमी पावन झाली.हिंदवी स्वराज्याची स्थापना करतांना स्वराज्याचा विस्तार करण्याच्या हेतूने शिवाजी महाराजांची नजर सुरतेकडे वळली. सुरत म्हणजे ऐश्वर्य ! अवघ्या जगातील व्यापाराच्या मोठ्या घडामोडी इथे चालत टोपीकर, इराणी, हाब्शी, इराणी, बगदादी, अरबी, बोहरा, खोजा, यहुदी, अफगाणी, मोगलही येथूनच व्यापार करीत असत. सुरत त्यावेळी मोगलांचे आर्थिक केंद्र आणि प्रमुख व्यापारी बंदर होते. तेथूनच मुघलांना लाखो रुपयांचा कर मिळायचा. औरंगजेबाच्या फौजेने ३ वर्षे रयत नासवली होती नागवली होती याची भरपाई म्हणून महाराजांना सुरतेतील संपती हवी होती.स्वारीवर निघण्यापूर्वी कोणालाही सुगावा न लागू देता बहिर्जी नाईक यांनी सोयीचे आणि अडचणीचे रस्ते यांची पाहणी केली होती. सुरतेवर निघण्याची तयारी जय्यत झाली आठ हजार घोडेस्वार तयार झाले निघण्याचा दिवस ठरला १५ डिसेंबर १६६३. आर्इं जगदंबेचे दर्शन घेऊन आणि आऊ साहेबांचा आशीर्वाद घेऊन शिवाजी राजे सोबत नेताजी पालकर, बहिर्जी नाईक यांना घेवून राजगडाहून निघाले ते थेट १०० कोस अंतरावर असलेल्या त्र्यंबकेश्वरास येवून पोहचले. त्र्यंबकेश्वराहून कोळवणातून सुरत गाठण्याचा बेत महाराजांनी आखला होता. महाराज दिवसा जंगलात मुक्काम करीत. मुक्कामाची जागा उंच भाग असलेल्या डोंगर टेकड्यांवर असे आणि रात्री प्रवासास निघत. त्र्यंबकेश्वराच्या शिविलंगास अभिषेक घालून पौष शुद्ध व्दितीया अर्थात ३१ डिसेंबर १६६३ या दिवशी शिवाजी राजे त्र्यंबकेश्वराच्या उत्तररांगांची खिंड आणि घाट उतरून कोळवणात म्हणजेच जव्हार मुलुखात उतरले. त्यावेळी जव्हार नरेश पहिले विक्र मशहा यांनी आनंदाने शिवरायांचे जव्हारच्या सीमेवर असणाऱ्या उंच टेकडीवर दरबार भरवून जंगी स्वागत केले. महाराजांशी दोस्तीची बोलणी केली आणी सुरतेकडे जाण्याच्या जवळच्या वाटांचे मार्गदर्शन केले. या दरबारात जव्हार संस्थांनच्यावतीने गौरव म्हणून शिवरायांच्या जिरेटोपात मौल्यवान असा शिरपेच सन्मानपूर्वक खोवण्यात आला. ३१ डिसेंबर १६६३ हा दिवस जव्हार संस्थांनच्या इतिहासातील एक सुवर्ण दिन ठरला. ज्या टेकडीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी वास्तव्य केले ती जव्हार शहरातील टेकडी आज शिरपामाळ म्हणून ओळखली जाते.मजल दरमजल करत महाराज सुरतेला पोहचले आणी ५ जानेवारी १६६४, मंगळवार रोजी शिवाजी राजांनी सुरत लुटली. सावकारांचे वाडे काबीज करून सोने, रूपे, मोतीं, पोवळे, माणिक, हिरे, पाचू, गोमेदराज अशी नवरत्ने; नाणे, मोहोरा, पुतळ्या, होन, नाणे याची लूट केली. कुठलेही ठिकाण सोडले जात नाही पण परधर्माची मंदिरेच काय साध्या मुक्या जनावरांना देखील धक्का लागणार नाही अशी लूट शिवाजी राजाने घडविली. दिनांक ५ जानेवारी १६६४ पासून पुढे ४ दिवस ही लूट चालू होती
३१ डिसेंबर १६६३ च्या शिवस्मृती
By admin | Published: January 01, 2017 3:52 AM