वाडा : या नगरपंचायतीच्या चार विषय समित्यांसाठी मंगळवारी झालेल्या निवडणूकीत शिवसेनेच्या तीन तर मित्र पक्ष असलेल्या बहुजन विकास आघाडीच्या एका सदस्याने बिनविरोध विजय मिळविला आहे. विरोधी पक्ष असलेल्या भाजपने उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने ती बिनविरोध झाली.
या नगरपंचायतीमध्ये मागील वर्षी शिवसेनेने कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, बहुजन विकास आघाडी व आरपीआय ला सोबत घेऊन सत्ता स्थापन केलेली असल्याने त्यावेळी झालेल्या करारानुसार समित्यांचे वाटप झाले होते. नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या गीतांजली कोलेकर विराजमान असून आज झालेल्या निवडणूकीत बांधकाम समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे गटनेते संदीप गणोरे, पाणीपुरवठा समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या जागृती काळण, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या शुभांगी धानवा तर नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी बहुजन विकास आघाडीचे वसीम शेख हे बिनविरोध निवडून आले.
वाडा नगरपंचायतमध्ये एकूण १७ सदस्य संख्या असून यामध्ये शिवसेना ६, भाजपा ६, काँग्रेस २, राष्ट्रवादी काँग्रेस,बहुजन विकास आघाडी व आर.पी.आय. यांचा प्रत्येकी एक सदस्य असे संख्याबळ आहे. नगरपंचायतीच्या पहिल्याच वर्षी काँग्रेस व आरपीआय ने शिवसेनेला पाठिंबा देऊन दोन विषय समित्यांचे सभापतीपद पदरात पाडून घेतले होते.दरम्यान नवनिर्वाचित सभापतींना शिवसेनेचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष निलेश गंधे, उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील, तालुका प्रमुख उमेश पटारे, शहर प्रमुख प्रकाश केणे, अरुण पाटील, नगराध्यक्षा गीतांजली कोलेकर, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक वैष्णवी रहाणे, संगिता ठाकरे, मनाली फोडसे, कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष मनिष गणोरे, तालुकाध्यक्ष प्रफुल्ल पाटील, दिलीप पाटील, बहुजन विकास आघाडीचे अनंता भोईर, देवेंद्र भानुशाली, भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप पवार, गटनेते मनिष देहेरकर यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अभिनंदन करून नव्या सभापतींना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.बांधकाम समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे गटनेते संदीप गणोरे, पाणीपुरवठा समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या जागृती काळण, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या शुभांगी धानवा तर नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी बहुजन विकास आघाडीचे वसीम शेख हे बिनविरोध निवडून आले.