वसई - वसई विरार शहर महापालिकेच्या नवघर माणिकपूर एच प्रभाग समिती अंतर्गत हद्दीतील कृष्णा टाऊनशिप येथील सोपारा खाडीचा मार्ग बदलून त्याजागी भलेमोठे मैदान तयार केल्याचा आरोप करून हा नाला पूर्ववत करा, तसेच ज्या अधिकाऱ्यांनी हा नाला बुजवून भराव घातला त्यांची तत्काळ चौकशी करून त्यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी सोमवारी सकाळी ११ वाजता वसई रोड शिवसेनेने नवघर माणिकपूर शहर विभागीय कार्यालयाबाहेर घंटानाद आंदोलन केले.यावेळी शिवसेनेने जनतेला या आंदोलनाची माहिती दिली. निरी व आयआयटीचा अहवाल समजाविला इतकेच नाही तर महापालिकेने सोपारा व वसई पश्चिम परिसरातील सांडपाणी जे सोपारा खाडीत सोडले जाते त्या जागेवर अंदाजे ७०० ते ८०० मीटर लांबीपर्यंत मातीचा भराव घालून पर्यावरण विभागाची कोणतीही परवानगी न घेता ती बुजवली आणि सांडपाणी वाहून जाण्यासाठी जो पर्यायी मार्ग तयार केला तो योग्य नसून तो सुरळीत करावा या मागणीचे निवेदन अनेकदा सेनेने तत्कालीन आयुक्त सतीश लोखंडे आणि सध्याचे आयुक्त बळीराम पवार यांना भेटून दिले. परंतु या गंभीर बाबीकडे प्रशासनाने आजपर्यंत जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचे आंदोलनावेळी स्पष्ट केले.विशेषत: निरी आणि आय.आय.टी. या संस्थेने देखील पान क्र .२१/२२ वर हा मार्ग योग्य नसून तो पाण्याचा निचरा होण्यास पुरेसा नाही. २०१९च्या पावसाळ्यापूर्वी त्या ठिकाणी योग्य मार्ग करण्यात यावा, अशी सक्त सूचना या केंद्रस्तरीय समितीने महानगरपालिकेला केल्या आहेत.यावेळी आंदोलनकर्त्यांनी महापालिका याविषयी गंभीर नसल्याचे सांगून पालिकेने स्वत:च बांधलेले मैदान हे कोणी बांधले आहे, असे आदेशच आयुक्तांनी काढले असल्याचे सांगितले. तर यावेळी माध्यमांनी विचारल्यावर आम्ही मैदानाच्या विरोधात नसून केंद्र सोपारा खाडी आणि परिसर ज्या अधिकारी वर्गांनी केंद्र व राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाची परवानगी न घेता थेट माती भराव घातला. त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत व त्यांना निलंबित करावे यासाठी व झोपलेल्या महानगरपालिकेला जागे करण्यासाठी हे आंदोलन करीत असल्याचे शिवसैनिकानी सांगितले.यावेळी माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण, निलेश तेंडोलकर, मिलिंद खानविलकर, विवेक पाटील, प्रवीण मप्रोलकर, राजा बाबर, मिलिंद चव्हाण, संजय गुरव, सुधाकर रेडकर, जसीथा फिनच, शैला हटकर व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.पालघर जिल्ह्यात मनाई आदेश लागू तरीही सेनेने घंटानाद आंदोलन केलेपालघर जिल्ह्यात सोमवार दि.२४ जून ते ७ जुलैपर्यंत पालघर जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी मनाई आदेश लागू केला आहे. आश्चर्य म्हणजे जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेसह जनजीवन सुरळीत राहावे, यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाद्वारे सर्वत्र जिल्ह्यात मनाई आदेश लागू केला. दरम्यान जिल्ह्यात मनाई आदेश असतांना देखील वसई रोड शिवसेनेने वसई विरार महापालिकेच्या विरोधात शेकडोंच्या संख्येने सार्वजनिक ठिकाणी गोळा होऊन घोषणाबाजी घंटा नाद केला तरीही माणिकपूर पोलिसांनी याबाबत कुठलीही कारवाई केली नसल्याची माहिती माणिकपूर पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी लोकमतला दिली.नाला हा जुनाच असून नंतर मैदान तयार झाले, परंतु इतकी वर्षे पाणी भरले नाही तर मागील वर्षीच पाणी भरले मग इतके वर्षे गेली. आज आंदोलन करणाऱ्यांनी त्यावेळी आंदोलन का केले नाही, आजच का? तर विरोधकांनी निरी व आयआयटी संस्थेचा स्पष्ट अहवाल व्यवस्थितपणे वाचलेला नसून त्यांना तो कळला की नाही याउलट मार्ग बदलला आहे किंवा माती भराव करून नाला बुजवला असल्याचे या अहवालात कुठेही नमूद नाही. त्यामुळे हे सर्व आरोप आपण फेटाळतो आहे.- राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता,वसई विरार शहर महापालिका
नवघर कार्यालयाबाहेर शिवेसेनेचा घंटानाद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 12:59 AM