पारोळ : वसई ग्रामीण भागात सकाळ पासूनच नव वर्षाचे स्वागत करण्यासाठी रस्ते गुढ्या, तोरणे, पताका व रांगोळ्यांनी सजवले होते. परिसरात जवळपास प्रत्येकाने आपल्या दारासमोर, खिडक्यांवर, गॅलरीत गुढ्या उभारल्या होत्या. वसई भागात नवं वर्ष दिनी सकाळच्या स्नानानंतर अनशापोटी कडुनिंबाचा रस पिण्याची प्रथा मंगळवारीही पाळली गेली. हा रस शरीरस्वास्थ्यासाठी अत्यंत गुणकारी असून आज पासून सुरू होणारे वर्ष आरोग्यदायी जावे हे यामागील शास्त्र असल्याचे जेष्ठ सांगतात. मात्र अत्यंत कडू चवीच्या रसाला लहानग्यांनी रस पिण्यास प्रथमत: नाके मुरडली तरी घरातील सर्व सदस्य हा रसपान करत असल्याने त्यांनीही वेडेवाकडे तोंड करून रस पिऊन परंपरा जपली आहे विरार पूर्वेतील ग्रामीण भागात जल्लोषात स्वागत यात्रा काढण्यात आल्या होत्या. यामध्ये खानिवडे चांदीप येथे काढलेल्या नव वर्ष शोभा यात्रेत गावकरी जल्लोषात नाचत होते. रस्ते गल्ल्या माणसांनी फुल्ल भरल्या होत्या. विरार पश्चिमेला व बोळींजला उंट, घोडे स्वार मावळे, रथातील छत्रपती शिवाजी महाराज, बैल गाडी, लेझीम व नाशिक ढोल बाजा च्या गजरात शोभा यात्रा काढण्यात आली होती. (वार्ताहर)
पारोळला जल्लोषात शोभायात्रा
By admin | Published: March 29, 2017 4:48 AM