- पंकज राऊत, बोईसर
रिडिंगमधील दोष, उशिरा घेण्यात येणारी मीटर रिडिंग, तांत्रिक दोष व फॉल्टी मीटर इत्यादी कारणांनी वापरापेक्षाही अधिक रकमेची वीज बिले वीजग्राहकाच्या माथी मारण्यात आली आहेत. या आंधळ्या कारभारामुळे वीज बिलांवरील रक्कम पाहून बोईसरकरांना अक्षरश: शॉकच बसला आहे. यामुळे वाढीव रकमेची बिले दुरुस्त करून घेण्याकरीता महावितरणच्या कार्यालयात खेटा माराव्या लागत असून दोष कुणाचा आणि त्रास कुणाला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.महावितरण बोईसर (ग्रामीण) उपविभागामध्ये एकूण आठ प्रभाग असून त्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे २३ हजार ६६८ वीजग्राहक फक्त बोईसर सेक्शनमध्ये आहेत. त्यातून प्रतिमहिना सुमारे दीड कोटी रुपयांचा महसूल महावितरणला मिळत आहे, बोईसर सेक्शनमधील वीजमीटर रिडिंग, डिजिटल फोटोग्राफी हे एका खासगी एजन्सीद्वारे घेतले जाते.बोईसर कॅमेरा व आय.आर. पद्धतीने मीटर रिडिंग घेतले जाते. रिडिंगचा काही वेळा फोटो फारच अस्पष्ट असतो. त्यामुळे अंदाजे अॅव्हरेज वीज बिल दिले जाते. तर रिडिंग घेतल्याची तारीख वीज बिलावर स्पष्ट पणे दिसणे ही बंधनकारक आहे. त्यामुळे ग्राहकांना दोन बिलमधील रिडिंगचे दिवस मोजता येऊ शकतील परंतु ती तारीख हेतूपुरस्पर अस्पष्ट छापली जाण्याचा आरोप वीजग्राहक करीत आहेत.आर.आर. पद्धतीच्या रिडिंगमध्ये फोटो येते नाही. फक्त रिडिंग येते बोईसरला सुमारे ८ हजार मीटरचे रिडिंग आय.आर. पद्धतीने घेतले जाते. परंतु ते रिडिंग घेतल्यानंतर त्यामध्ये सलग दोन महिने तांत्रिक दोष निर्माण झाल्याचे समजते त्यामुळे ग्राहकांना अॅव्हरेज बिले देण्यात आले होते. त्यामध्ये चुकून कमी अॅव्हरेज दाखविले गेले. परंतु नंतर रिडिंग घेतल्यानंतर तो युनिटमधील फरक सामावल्याने एकदम भरमसाट वीज बिले आलीत त्यातच बोईसरमध्ये फ्लॅश इलेक्ट्रॉनिक कंपनीची बहुसंख्य मीटर सदोष आहेत. वीजपुरवठा खंडित असला तरी मीटर फिरतच असतात त्यामुळे त्या सदोष मीटरचा प्रमाणात नाहक भुर्दंड ग्राहकांना भरावा लागतो.बोईसरमध्ये काही भागात वीज बिले वाढीव रकमेची आली आहेत. ही वस्तुस्थिती आहे. परंतु आय.आर. पद्धतीने घेण्यात आलेल्या रिडिंगच्या सिस्टीममध्ये तांत्रिक दोष निर्माण झाला होता तो दोष त्वरीत दुरुस्त करण्यात येऊन युनिटचा स्लॅब वाढल्याने ज्या ग्राहकांना अनावश्यक पडलेल्या भुर्दंडाबाबत योग्य तो मार्गही काढला जाईल. तसेच चुकीची रिडिंग घेणाऱ्या एजन्सीवर कडक कारवाई अथवा त्या एजन्सीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची शिफारस केली जाईल तसेच ग्राहकांना एकाच ठिकाणी वीज बिलांची दुरुस्ती करून देता येईल का याबाबत विचार केला जाईल.- रुपेश पाटील, उपकार्यकारी अभियंता, बोईसर ग्रामीण उपविभाग