मीरा रोड : उत्तन येथे राहणाऱ्या लेझली डिसोझा यांचे सहा वर्षापूर्वी निधन झाले असताना त्यांच्या घरावर चक्क ती व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने कंटेनमेंट झोनचा फलक लावण्यात आल्याचा प्रकार घडला. या प्रकाराने नातलगांनी पालिका आरोग्य केंद्रात जाऊन संताप व्यक्त केल्यावर नावाच्या साधर्म्यातून हा प्रकार घडल्याचे समोर आले.
डिसोझा यांचे सहा वर्षापूर्वी निधन झाले असून त्यांचे घर तीन वर्षापासून बंद आहे. त्यांची मुले आजूबाजूलाच राहतात. बुधवारी महापालिकेच्या उत्तन आरोग्य केंद्रातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी लेझली डिसोझा यांचे घर हेच का असे आजूबाजूला विचारले. लेझली यांचे हेच घर असे कळल्यावर घराला टाळे असूनही कंटेनमेंट झोनचा फलक लावला. त्याच ठिकाणी असलेल्या लेझली यांच्या कुटुंबातील एका अल्पवयीन मुलाने जुन्या बंद घरावर फलक लावताना पहिले. वैद्यकीय कर्मचाºयांनी त्या मुलाकडे स्वाक्षरी मागितली असता त्याने नकार दिला. आपल्या जुन्या घरावर पालिकेच्या कर्मचाºयांनी कंटेनमेंट झोनचा फलक लावल्याचे कळताच लेझली यांचे कुटुंब संतप्त झाले . त्यांनी पालिकेच्या आरोग्य केंद्रात जाऊन याचा जाब विचारला. डिसोझा कुटुंब खूपच संतापले होते. लेझली यांचे सहा वर्षापूर्वी निधन झाले आहे. घर बंद असतानाही कंटेनमेंट झोनचा फलक लावलाच कसा? लहान मुलाकडे स्वाक्षरी का मागितली ? असा सवाल केला. अखेर पालिका कर्मचाºयांनीही चूक झाल्याचे मान्य केले व माफी मागितली.