वसई/पारोळ : शुक्रवारी रात्री ११ वा.च्या सुमारास विरार पश्चिमेस आगाशी येथे एका कपडाविक्रीच्या दुकानाला आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात जीवितहानी झाली नसल्याचे अर्नाळा सागरी पोलिसांनी सांगितले.आगाशी बाजारामध्ये असलेल्या कापडिया यांच्या साडीच्या दुकानाला अचानक आग लागली. हे दुकान जुन्या पद्धतीचे असून लाकडी बनावटीचे होते. त्यामुळे अवघ्या काही मिनिटांतच आगीने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केले. घटनेची खबर लागताच महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व त्वरित आग विझवण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला. ही आग विझवायला त्यांना ४ ते ५ तास झुंजावे लागले. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत शेजारील दुकानदार तसेच नागरिकांनी दुकानातील सामान बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि हंडे, कळशी अशा तत्सम साधनांनी पाणी मारून आग विझवण्याचा प्रयत्न केला. आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी ठोस कारण मात्र कळू शकले नाही, असे अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यातील अंमलदार यांनी सांगितले. आगीत मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आह,े मात्र जीवितहानी झाली नाही, असेही सांगण्यात आले. गेल्या एका आठवड्यात विरार परिसरात दोन मोठ्या आगीच्या घटना घडल्या आहेत. (प्रतिनिधी)
आगाशी येथे कपड्यांचे दुकान खाक
By admin | Published: November 22, 2015 12:08 AM