वाडा : या तालुक्यातील नारे ग्रामपंचायत हद्दीतील सेंट गोबेन (जिप्सम)कंपनीच्या प्रदूषणाबाबत नारे ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी केलेल्या तक्र ारी बाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या चौकशीत कंपनी दोषी आढळली असून मंडळाने कंपनीला परवाना रद्द का करू नये व उत्पादन का थांबवू नये याची कारणे दाखवा नोटीस बजावली असून कंपनीला दोन दिवसांत खुलासा देण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाई मुळे कंपनी व्यवस्थापनाचे धाबे दणाणले आहे. वाडा तालुक्यातील नारे गावातील जिप्सम कंपनीच्या प्रदूषणामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले असून याबाबत ग्रामसभेतील चर्चा व ठरावाच्या आधारे ग्रामपंचायतीने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली होती. तसेच लोकमतमधील बातम्यांची दखल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेऊन मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी ३० डिसेंबर २०१६ रोजी केलेल्या चौकशीत कंपनी दोषी आढळली आहे. परिसरात सोडले जाणारे सांडपाणी, गावाच्या हद्दीत उघड्यावर टाकला जाणारा कचरा, जिप्सम शीट्स चे उघड्यावर क्रशिंग करून पावडर तयार करणे, कंपनी परिसरात तिचा साठा उघड्यावर ठेवणे, कंपनी परिसरात उघड्यावर प्लाय अॅशचा साठा ठेवणे याबाबत कंपनीने कमालीचा हलगर्जीपणा दाखिवला असून जलप्रदूषण नियंत्रण कायदा, वायू प्रदूषण नियंत्रण कायदा तसेच धोकादायक वस्तूची विल्हेवाट लावण्याबाबतचा कायदा मधील तरतुदींचा भंग केलेला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीत मंडळाला तथ्य आढळले आहे.(वार्ताहर)
जिप्समला कारणे दाखवा खुलासा ४८ तासांत देण्याचा आदेश
By admin | Published: January 09, 2017 6:16 AM