जव्हार : तालुक्यातील पिंपळशेत खरोंडा ग्रामपंचायत हद्दीतील हुंबरण या दुर्गम पाड्यात राहणाऱ्या कल्पना राजू रावते या आदिवासी महिलेच्या पोटी जन्मणाऱ्या बाळाचा उपचाराअभावी जन्मतानाच मृत्यू झाला. आरोग्याच्या मूलभूत सुविधांची आजही ग्रामीण भागात वानवा असून यामुळेच बळी जात असल्याचे कारण देत श्रमजीवी संघटनेच्या वतीने मंगळवारी जव्हार कुटीर रुग्णालयाच्या आवारात आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
दुर्गम भागात जेथे अद्याप रस्ते नीट नाहीत, दळणवळणाची साधने नाहीत किंवा पुरेशी उपलब्ध नाहीत, अशा ठिकाणची सर्व आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये येथे मूलभूत सुविधा असाव्यात. स्वत:च्या निष्काळजीपणामुळे बाळाच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, रुग्णवाहिका ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून, ठेका रद्द करून नवीन ठेकेदार नेमावा, दुर्गम भागातील आरोग्य पथक केंद्रात निवासी डॉक्टर आणि कर्मचारी यांच्यासह प्रसूती आणि अन्य आरोग्य उपचारांसाठी कायम सुसज्ज व्यवस्था ठेवावी. आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे (पथके), ग्रामीण रुग्णालये २४ तास सुरू ठेवावीत, वैद्यकीय अधिकारी यांचे फोन २४ तास सुरू असावेत, जव्हारमध्ये २०० खाटांचे रुग्णालय तातडीने सुरू करण्यात यावे, अशा मागण्या या वेळी निवेदनाद्वारे करण्यात आल्या. या वेळी संघटनेचे विजय जाधव, सुरेश रिंजड, कमलाकर भोर, संतोष धिंडा, गोविंद गावित, अजित गायकवाड, सीता घाटाळ, जमशेद खान आदी उपस्थित होते.