शशी करपे । लोकमत न्यूज नेटवर्कवसई : वाहतूक पोलिसांच्या मागणीवरून वसई विरार महापालिकेने शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तीन कोटी खर्च करून सोळा ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली आहे. मात्र, सिग्नलजवळ वाहतूक पोलीस नसल्याने वाहनचालक नियम धुडकावत असल्याने सिग्नल यंत्रणा फेल गेली आहे. वाहतूक विभागात मनुष्यबळाची कमतरता असल्याचे कारण पुढे केले जात असले तरी वाहतूक पोलिस बेकायदा वाहनांकडून आर्थिक मलिदा मिळवण्यात मग्न असल्याचे दिसत आहे. वसई विरार शहरात सध्या वाहनांच्या वाढत्या संख्येने वाहतूक कोंडीने डोकेदुखी वाढवली आहे. यावर उपाय म्हणून शहरात ५२ ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवावी अशी मागणी वाहतूक पोलिसांनी वसई विरार महापालिकेकडे केली होती. त्यावर सर्व्हे करून महापालिकेने सोळा ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली आहे. त्यासाठी सुमारे तीन कोटी रुपये खर्च केले आहेत. सकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत सिग्नल सुरु असतात. मात्र, सिग्नलजवळ वाहतूक पोलीस नसल्याने तिला कुणीही जुमानत नाही. सिग्नल यंत्रणा व्यवस्थितपणे चालवण्यात वाहतूक पोलीस अपयशी ठरले आहेत. त्यामुळे अवघे ५० संख्याबळ असलेल्या वाहतूक शाखेने ५२ ठिकाणी सिग्नल यंत्रणा मागताना कोणते नियोजन केले होते असा प्रश्न आता महापालिकेतील अधिकारी उपस्थित करू लागले आहेत. दुसरीकडे, नव्याने कार्यभार हाती घेतलेले पोलीस निरीक्षक संपत पाटील यांनी यावर तोडगा काढण्यासाठी काही पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. एकतर मनुष्यबळ वाढवावे, अशी त्यांनी वरिष्ठ पातळीवर मागणी केली आहे. त्याचवेळी नवीन महिला पोलिसांना वाहतूक विभागात पाठवून त्यांच्यावर सिग्नलची जबाबदारी सोपवण्याचा प्रयत्न पाटील करीत आहेत. दरम्यान, वसई वाहतूक शाखेकडे अवघे ५० पोलीस बळ आहे. त्यापैकी दररोज किमान दहा-बारा कर्मचारी रजा, कार्यालयीन कामे, न्यायालयीन कामे आदी कारणांमुळे कमी असतात. त्यामुळे अवघ्या तीस-पत्तीस पोलिसांवर सुमारे वीस लाख लोकसंख्या असलेल्या शहरातील वाहतूक कोंडीचा बोजा पडला आहे.
वसईत ३ कोटीची सिग्नल यंत्रणा फेल
By admin | Published: June 28, 2017 3:08 AM