वसई : १ नोव्हेंबर पासून सकाळी ९:५७ वाजता वसईहून सुटणारी महिलालोकल रद्द करून ती विरारहून अंधेरीपर्यंत सोडण्यात आली. त्यामुळे वसई, नायगांव येथून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आता याबाबत मी वसईकर अभियानाने सह्यांची मोहिम हाती घेतली असून लवकरच रेल्वेमंत्री पियूष गोयल यांना सह्यांचे हे निवेदन सादर करणार असल्याचे समन्वयक मिलींद खानोलकर यांनी सांगितले.
वसई रोड स्थानकावरून सोडण्यात येणारी महिला विशेष लोकल रद्द केल्यामूळे वसई व नायगाव येथील महिलांचा प्रवास आता जीवघेणा झाला आहे. ती लोकल पुन्हा वसईहून सोडण्यात यावी व विरारच्या व नालासोपारा येथील महिलां करिता वेगळी महिला लोकल विरारहून सोडण्यात यावी या मागणीकरिता आजपासून स्वाक्षरी अभियान सुरू केलं. त्यास प्रवाशांनी सह्या करून भरघोस पाठिंबा दिला. मी वसईकर अभियानाचे असंख्य कार्यकर्ते विशेषत: महिला कार्यकर्त्या यांनी या अभियानात मोठा सहभाग घेतला. ही लोकल पुन्हा वसईहून सुरू होत नाही तो पर्यत त्यासाठीचे आंदोलन व प्रयत्न सुरूच राहणार आहे. वसई (पूर्व) नायगाव (पूर्व) नायगाव (पश्चिम) येथे निवेदनावर सह्या घेण्याची मोहीम सुरूच राहणार असून, त्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. सध्या हे आंदोलन शांततामय मार्गाने चालविण्यात येते आहे. त्याला यश येईल अशी अपेक्षा आहे.