वसई - गुरुवारी रात्री कोमल चव्हाण (१९) या तरुणीला धावत्या लोकलमधून ढकलून देणाºया माथेफिरूचा फोटो नालासोपारा रेल्वे स्टेशनवर असलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून रेल्वे पोलिसांच्या हाती लागला असला तरी तो अद्याप मोकाटच आहे.नालासोपारा येथे राहणारी कोमल चव्हाण गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास विरारहून लोकलने निघाली होती. त्यावेळी ती डब्यात एकटीच होती. लोकल सुुरु झाल्यानंतर एका माथेफिरू इसमाने डब्यात प्रवेश केला. त्यानंतर त्याने तिच्याकडे पैशांसाठी तगादा धरला. कोमलने नकार दिला असता त्याने तिला धावत्या लोकलमधून विरार रेल्वे स्टेशनवर ढकलून दिले होते. यात ती जखमी झाली असून तिच्यावर विरारमधील हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत.दरम्यान, ही घटना विरार रेल्वे स्टेशनवर असलेल्या सीसीटीव्हीत दिसत असली तरी माथेफिरूचा स्पष्ट चेहरा दिसत नाही. त्यामुळे इसमाचा शोध घेणे कठीण जात होते. यासाठी माथेफिरूचा शोध घेण्यासाठी रेल्वे पोलिसांनी सर्व रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असता त्या माथेफिरूचा चेहरा नालासोपारा रेल्वे स्टेशनमध्ये असलेल्या फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.तिला धक्का दिल्यानंतर तो नालासोपारा स्टेशनवर उतरून बाहेर निघून गेल्याचे आता स्पष्ट झाल आहे. माथेफिरूचा चेहरा स्पष्ट दिसत असल्याने पोलिसांनी आता तपासाला वेग दिला आहे. मात्र, महिलांच्या डब्यात पोलीस कर्मचारी असणे गरजेचे असताना कोमल प्रवास करीत असलेल्या लोकलच्या डब्यात पोलीस कर्मचारी का नव्हता याबाबत रेल्वे पोलिसांनी अद्याप मौन बाळगले आहे.
तरुणींला ढकलणारा मोकाटच!, सीसीटीव्हीत दिसला, महिलेच्या डब्यात पोलीस नसल्याबद्दल मौन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 5:56 AM