वसई : नालासोपारा शहरातील सरकारी जागेवर अतिक्रमण करून त्याठिकाणी बेकायदा चाळी बांधल्या जात असून त्याकडे महापालिका दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार भाजपाने आयुक्तांकडे केली आहे.नालासोपारा पूर्वेला सर्व्हे क्रमांक ४११ वर अतिक्रमण करू न बेकायदेशीर बहुमजली इमारती बांधल्या आहेत. तसेच बोगस सीसी बनवून तेथील फ्लॅट विकून लोकांची आणि वित्तीय संस्थांची फसवणूक करण्यात आलेली आहे. त्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई महापालिकेने केली नसल्याने सर्व इमारतींमध्ये लोक राहावयास आले आहेत.आता येथील सर्व्हे क्रमांक ४१० मधील जागांवर अतिक्रमण करून त्याठिकाणी बेकायदा चाळी बांधण्याचे काम वेगाने सुरु आहे. याप्रकरणी भाजपाचे युवा मोर्चाचे वॉर्ड क्रमांक ५६ चे अध्यक्ष डेरीक आलेक्स डाबरे यांनी आयुक्तांकडे तक्रार केली आहे. ही बांधकामे तोडून भूमाफियांवर एमआरटीपी अंतर्गत कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने शुक्रवारी रात्रीपासून रविवारपर्यंत सुट्टीच्या दिवशी चाळी बांधण्याचे काम वेगाने केले जाऊन रहिवाशांना त्यात घुसविण्यात येत असल्याकडेही महापालिकेचे लक्ष वेधण्यात आले आहे.
सोपा-यात सरकारी जागेवर अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 12:41 AM