वसई : निवडणूक म्हटली की सगळ्याच कार्यकर्त्यांची मागणी असते ती स्टार कॅम्पेनरच्या जाहीरसभा आयोजित करण्याची परंतु वसई-विरार महापालिकेच्या निवडणूकीत मात्र मोठ्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मात्र आपल्या नेत्यांना साहेब मेहबानी करा, पण जाहीरसभा ठेऊ नका’ असे साकडे घालत आहेत.आधीच प्रचारासाठी वेळ अत्यंत कमी मिळालेला, वॉर्डांची फेररचना आणि त्यात घोषीत झालेले आरक्षण यामुळे उमेदवार शोधता-शोधता आलेले नाकीनऊ त्यामुळे सभा घेण्यापेक्षा उमेदवारांच्या घरोघरी जाऊन थेट संपर्क प्रस्थापित करणे कार्यकर्त्यांना व उमेदवारांना अधिक महत्वाचे वाटते आहे. एक सभा घेण्यासाठी किमान अर्धा दिवस तरी जातो. शिवाय गर्दी जमवायची कुठून? हा प्रश्न आहे. त्यात एवढा कुटाणा करून जर सभा ठेवलीच तरी कोणत्या क्षणी वादळ आणि पाऊस येईल याची कोणतीही शाश्वती नाही. शिवाय सभेचा खर्च करायचा कुणी? असाही प्रश्न आहे. त्यामुळे सभेमध्ये ताकद आणि पैसा खर्ची घालण्यापेक्षा पदयात्रा, थेटभेटी यावर अधिक भर देण्यास उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते हे अधिक पसंती देत आहेत. यामुळे वेळेचा चांगला वापर करता येईल, अशी त्यांची भावना आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अन्य पक्षांनी जाहीरसभांवर भर दिलेला नाही. सेना, भाजप युतीच्या सभा जरी सुरु असल्यातरी त्याबाबतही कार्यकर्ते आणि उमेदवार काहीसे कुर-कुर करीत आहेत. आम्ही सभा यशस्वी करायच्या की, प्रचार सांभाळायचा असा त्यांचा प्रश्न आहे. एखाद्या घटनेमुळे सभेवर कसे पाणी फिरते याचे उदाहरण युतीला पहायला मिळाले आहे. सवरा यांची सभा वसईमध्ये आयोजीत केली होती. परंतु हायवेवर झालेल्या अपघातात एका बालिकेचा बळी गेला आणि सगळे वातावरणच शोकाकुल झाले. अशा स्थितीत सभा घ्यायची कशी? असा प्रश्न निर्माण झाला. सध्या वातावरणही क्षणात वादळ, क्षणात पाऊस मध्येच वीज जाणे असे बेभरवशी झाले आहे. त्यालाही कार्यकर्ते पार वैतागून गेले आहेत. (विशेष प्रतिनिधी)
साहेब मेहरबानी करा, अन सभा टाळा उमेदवारांचे नेत्यांना साकडे
By admin | Published: June 08, 2015 4:29 AM