(मंगेश कराळे)
नालासोपारा :- विरारमधील एका बांधकाम व्यावसायिकावर हल्ला केल्याप्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर ५ आरोपींना १० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विरार येथे राहणारे बांधकाम व्यावसायिक प्रमोद देसले यांच्यावर २६ सप्टेंबरला दुपारी २ वाजता त्यांच्या कार्यालयाबाहेर आरोपींनी हल्ला केला होता. देसले हे आपल्या दिशांत बिल्डर्स या कार्यालयातून घरी जाण्यासाठी निघाले असताना बाहेर उभ्या असलेल्या एका गाडीतून उतरुन आरोपींनी त्यांच्यावर बेस बॉलच्या दांड्यानी हल्ला केला. त्यावेळी देसले यांनी वाचवा, वाचवा असा धावा केल्यावर नागरिक जमलेले पाहून हल्लेखोर निघून गेले. या हल्ल्यात देसले यांच्या उजव्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हा हल्ला प्रमोद दळवी आणि श्रेयस म्हात्रे यांनी घडवून आणल्याचा संशय प्रमोद देसले यांनी पोलीसांना दिलेल्या तक्रारीत व्यक्त केला होता. याप्रकरणी विरार पोलिसांनी वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अखेर प्रतीक कृष्णा भोईर (२४), मनीष वसंत गायकवाड (२५), भावेश आत्माराम गवाले (२३), अमर मोहन शिर्के (२९) आणि हितेश अंबादास नाईक (२६) या पाच आरोपींना अटक करून वसई न्यायालयात हजर केले. वसई न्यायालयाने पाचही आरोपींना १० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर सहावा आरोपी सारिम उर्फ साहिल याला मंगळवारी अटक केली आहे.