लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : तालुक्यातील टेम्भीखोडावे सह इतर रेती बंदरावर बेकायदेशीर पणे सक्शन पंपाद्वारे रेती उत्खनन करणाऱ्या ६ बोटी जप्त करून त्यां पेटवल्या. तर सहा लोकांवर गुन्हेही दाखल करण्याचे आदेश पालघरचे तहसीलदार महेश सागर ह्यांनी दिले आहेत.तालुक्यात चहाडे, वसरे, बहाडोली, टेम्भीखोडावे, वाढीव आदी भागातून वाहणाऱ्या नदीतून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रित्या रेती उत्खनन केले जात होते. तसेच पूर्ण राज्यातच मोठ्या प्रमाणात रेती उत्खननाचे प्रमाण वाढू लागल्या नंतर पर्यावरणाची होणारी हानी पाहता उच्च न्यायालयात काही पर्यावरण प्रेमींनी याचिका दाखल केल्या होत्या.ह्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने सक्शन पंपाद्वारे रेती उत्खननाला पूर्णत: बंदी घातली होती. त्यामुळे तहसीलदार सागर ह्यांनी ही उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रेती उत्खनन करणाऱ्या गावागावात जाऊन लोकांनी बेकायदेशीर रित्या रेती उत्खनन करून पर्यावरणाची हानी करू नये यासाठी उद्बोधनपर कार्यक्र माचे आयोजन करून रेती उत्खनन करून पर्यावरणाची हानी करू नका असे आवाहन केले होते. मात्र, पैश्याच्या अतिहव्यासा पोटी काही लोकांनी चोरट्या पद्धतीने रेती उत्खनन सुरूच ठेवले होते. उपजिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी विकास गजरे ह्यांनीही बेकायदेशीर रेती वाहतूक करणाऱ्या गाड्या पकडून त्यांचे बॉण्ड लिहून घेत पुन्हा तीच गाडी सापडल्यास गाडीचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याची कारवाई करणार असल्याच्या सूचना दिल्या होत्या.मात्र, ह्यांचा काहीही परिणाम होत नसल्याने काल तहसीलदार सागर ह्यांनी टेम्भीखोडावे येथील रेती बंदरावर धाड टाकली. ह्यावेळी तेथे असलेल्या सहा सक्शनधारी बोटी ताब्यात घेऊन त्या पेटवून दिल्या. तर तीन सक्शन पंप नदीत बुडविले आणि सहा जना विरोधात केळवे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल केले. ह्यावेळी कारवाईत केळवे पोळी स्टेशन च्या सहा.पो.नी.जायभाये मंडळ अधिकारी संदीप म्हात्रे,बारावे तलाठी वसावे आदी जण ह्या कारवाईत सहभागी झाले होते.
रेती उत्खनन करणाऱ्या सहा बोटी पेटवल्या
By admin | Published: July 03, 2017 5:56 AM