- पंकज राऊतबोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाइपलाइनमध्ये सांडपाण्याबरोबरच डांबरसदृश रासायनिक गाळ (स्लज) कोणत्यातरी कारखान्यातून अनधिकृतपणे सोडण्यात आल्याने ही पाइपलाइन चोकअप झाली आहे. यामुळे पाच दिवसांपासून काही चेंबर ओव्हर फ्लो होऊन मोठ्या प्रमाणात सांडपाणी रस्त्यावर वाहते आहे.तारापूर एमआयडीसीमधील टी झोनमध्ये असलेल्या कारखान्यांमधून निघणारे रासायनिक प्रदूषित सांडपाणी (इनफ्लूअंट) ८०० एमएम व्यासाच्या पाइपलाइनद्वारे २५ एमएलडी क्षमतेच्या जुन्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात (सीईटीपी) वाहून नेले जाते. परंतु त्या भागातील कुठल्यातरी कारखान्यातून रासायनिक सांडपाण्याबरोबरच रासायनिक गाळ अनधिकृतपणे सोडण्यात आल्याने त्या गाळाचे वाहत्या पाण्यात घट्ट डांबर सदृश वस्तूत रूपांतर होत असल्याने पाइपलाइन चोकअप होत आहे.पाच दिवसांपासून चोकअप काढण्याचे प्रयत्न सुरू असून पाईप लाईन मोकळी करण्यात काही तांत्रिक अडथळे येत असल्याने त्याला फारसे यश आलेले नाही. या पाइपलाइनमध्ये घट्ट झालेले डांबरसदृश गोळे काढणे मोठी डोकेदुखी झाली आहे. दरम्यान, स्लज सोडणाºया कारखान्याचा शोध महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे अधिकारी घेत आहेत तर गुरुवार, २ जानेवारी रोजी तारापूर इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे (टीमा) पदाधिकारी ‘टी’ झोन मधील कारखानदारांच्या प्रतिनिधींची बैठक घेवून समज देणार आहेत असे समजते.पैसे वाचवण्यासाठी पाइपलाइनमध्ये स्लज?उत्पादन प्रक्रि येनंतर जो काही रासायनिक गाळ निघतो तो गाळ मुंबई वेस्ट मॅनेजमेंटकडे प्रक्रि येसाठी पाठविणे बंधनकारक आहे. परंतु ते प्रचंड खर्चिकही आहे. त्यामुळे पैसे वाचविण्यासाठी सांडपाण्याच्या पाईप लाईनमध्ये स्लज सोडले तर जात नाही ना? अशी शंका तारापूर एमआयडीसीमध्ये व्यक्त करण्यात येत आहे.रासायनिक सांडपाण्याच्या पाईपलाईनमध्ये डांबर मिश्रित मटेरियल तयार होत होऊन ते हार्ड होत असल्यामुळे पाईप लाईन चोकअप होत आहे. पाच दिवसांपासून तिथे काम सुरू आहे. कॉस्टिक सोडा टाकून डांबर सदृश वस्तू वितळवून अडथळा दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. तर सांडपाणी कलेक्शनची पाईपलाईन बंदही करता येत नाही अशी दुहेरी अडचण आहे.- राजेंद्र तोतला, उपअभियंता.
सांडपाण्याच्या पाइपलाइनमध्ये साचला गाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 10:23 PM