किन्हवली : शहापूर तालुक्यातील आष्टे आणि लवले ग्रामपंचायत हद्दीमध्ये नदीशेजारी असणाऱ्या फार्महाउसमध्ये बेकायदा चालणाºया मत्स्यपालन व्यवसायामुळे आष्टे, लवले व ठुणे परिसरांत दुर्गंधी पसरली आहे. त्याविरोधात मनसेचे तालुका उपाध्यक्ष व लवले ग्रामपंचायतीचे उपसरपंच दिनेश वेखंडे यांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी, महावितरणला निवेदन देत नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालणाºया व्यवसायाला आळा घालण्याची मागणी केली आहे. कारवाई न झाल्यास मनसेस्टाइल आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
आष्टे व लवले ग्रामपंचायत हद्दीत १० ते १५ शेततलाव खोदलेले आहेत. या तलावात एक खाजगी फार्महाउसचालक मागील सहा वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय मत्स्यव्यवसाय करत आहे. याठिकाणी माशांची कमी कालावधीत जास्त वाढ व्हावी, यासाठी माशांना मांस खाऊ घातले जाते. मृत प्राण्यांंचे मांस रात्री गुपचूप आणले जाते. या कुजलेल्या माशांच्या घाणीमुळे आष्टे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून नदीतील पाण्यालाही वास येत आहे.तलावातील दूषित पाणी शेजारीच असणाºया कानवी नदीपात्रात सोडले जात असल्याने हे पाणी पिऊन बरेच नागरिक आजारी पडलेले आहेत.शिवाय, त्या तलावातून निघणारी घाणही गावाशेजारी आणून टाकली जाते. याच नदीच्या पाण्यावर लवले व ठुणे या ग्रामपंचायत हद्दीतील सुमारे चार ते साडेचार हजार नागरिकांना पाणीपुरवठा करणाºया नळपाणीपुरवठा योजना आहेत. कानवी नदीच्या काठावर श्रीकपलेश्वर मठ लवले, चेरवली मठ अशी धार्मिक स्थळे आहेत. त्यामुळे या दूषित पाण्याचा साधूंनाही त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासन आता कुठली कारवाई करते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.फार्महाउसमधील या तलावात पाणी भरण्यासाठी पाच मोटार बसवलेल्या आहेत. मात्र, महावितरण कंपनीचे मीटर न बसवताच मागील सहा वर्षांपासून चोरून विजेचा वापर केला जात असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. लवले, आष्टे व ठुणे परिसरांतील नागरिकांचे आरोग्य बिघडवणाºया या व्यावसायिकाला एका राजकीय नेत्याचे पाठबळ असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून नागरिकांनाही न जुमानणाºया या फार्महाउसचालकाविरोधात वेखंडे यांनी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे.