वाडा : वाडा-खोडाळा मार्गावरील देसई नाक्यावरील नाकेदार राजू पोले यांनी टेम्पोला पाठलाग करून अडविले असता त्यात खैराचे ६६ ओंडके आढळले असून माल व टेम्पो वनविभागाने जप्त केला आहे.रविवार म्हणजे सुट्टीचा वार असा गैरसमज बाळगून तस्करांनी खैराची चोरटी तोड करून वाड्यातील हरोसाळे ,देवळी मार्गे मलवाडा अशी वाहतूक करण्याचा बेत आखला मात्र याची खबर नाकेदार पोले यांना मिळाली. त्यांनी पश्चिम वाडा चे वनक्षेत्रपाल टी. एल.लंगडे यांना तशी माहिती देत आपल्या अन्य सहकाऱ्यांना बोलाविले. संध्याकाळी ४.च्या सुमारास संशयास्पद टेम्पो जातांना दिसताच त्याचा पाठलाग केला. देवळी गावाजवळ या टेम्पोला अडविण्यात आले असता त्यातील चालक फरार झाला.या टेम्पोत खैराचे६६ ओंडके आढळले असून वाहनासह सुमारे अडीच लाखांचा माल वनविभागाने जप्त केला आहे. याबाबत अधिक तपास सुरू असून सदर कारवाईत वनपाल व्ही.जे.मूळमुळे, वनरक्षक शामसुंदर बिहर, नशीब पाटील, संतोष बच्छाव, डी.व्हि.कदम यांच्यासह पूर्व व पश्चिम वाडा वनविभागातील अन्य कर्मचारी सहभागी होते. (वार्ताहर)
तस्करीचे खैर जप्त
By admin | Published: January 10, 2017 5:46 AM