पालघर : येथील समीर हरेश्वर पिंपळे (३६) या शिक्षकाच्या मृत्यू प्रकरणी त्याच्या वडिलांनी खुनाचा संशय व्यक्त केल्याने या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे. त्यांनी याप्रकरणी सून व तिचा मित्र यांच्यातील अनैतिक संबंधांतून माझ्या मुलाचा बळी गेल्याचा आरोप केला आहे. ही तक्रार पालघरच्या पोलीस अधीक्षकाकडे करण्यात आली आहे. पालघर पोलीस स्टेशनच्या तपासाबाबतही त्यांनी संशय व्यक्त केला आहे.पालघरच्या आयडीबीआय बँकेच्या मागील हेरिटेज बिल्डिंगमध्ये शिक्षक असलेले समीर व त्यांची पत्नी आपल्या सात वर्षांच्या मुलीबरोबर राहत होते. समीरला आपल्या पत्नीचे पालघर, चार रस्त्यावर टुरिस्टचा व्यवसाय करणाऱ्या एका तरुणाबरोबर अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. या कारणावरून दोघा पतीपत्नीमध्ये नेहमीच खटके उडत असत. या संशयावरून समीरच्या पत्नीच्या पोलीस असलेल्या भावाने फोनवरून दमदाटी केल्याची तक्रार समीरने १५ एप्रिल २०१५ रोजी पालघर पोलीस स्टेशनमध्ये केली होती. याचा राग येऊन समीरच्या पत्नीनेही १६ जुलै रोजी आपला पती दारू पिऊन मला त्रास देत असल्याची तक्रार पालघर पोलीस स्टेशनमध्ये केली होती. तसेच आपल्या पतीपासून आपल्याला घटस्फोट मिळावा, अशी नोटीस आपल्या वकिलामार्फत आपल्या पतीला बजावली होती. या प्रकरणी दोघांच्या कुटुंबांच्या माध्यमातून समेट झाल्याचे समीरचे वडील हरेश्वर पिंपळे यांनी पोलीस जबाबात म्हटले आहे.
तो खून अनैतिक संबंधांतूनच !
By admin | Published: July 20, 2015 3:09 AM