जव्हार : आदिवासी विकास विभाग व विकास प्रकल्पांतर्गत चालवण्यात येणा-या आदिवासी वसतिगृहातील समस्या सोडविण्यासाठी आदिवासी विद्यार्थी कृती समिती महाराष्ट्र यांच्या वतीने मंगळवार दुपारी १ वाजता, जव्हार आदिवासी विकास प्रकल्पावर शेकडों विद्यार्थांचा भव्य मोर्चा काढण्यात आला. वसतीगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थांसमोर अनेक समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड व काही पनवेल येथील वसतिगृहात राहणारे विद्यार्थी या मोर्च्यात सहभागी झाले होते. या मोर्चाची सुरुवात हनुमान पॉइंट जवळील वसतिगृहापासून झाली. शेकडो विद्यार्थी मोर्च्यात सहभागी झाले होते व मोर्च्यादरम्यान विद्यार्थांनी घोषणा दिल्या. गांधीचौक, यशवंत नगर, येथून थेट जव्हार प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढणात आला. तसेच चार महिन्यापूर्वी पनवेल येथे आदिवासी विद्यार्थांनी काढलेल्या मोर्च्याला हिंसक वळण लागल्याने, मोर्चा काढणाऱ्या, आदिवासी विद्यार्थांवर यापूर्वी फौजदारी गुन्हे झाले होते. असे होऊ नये म्हणून, येथील पोलिसांनी आज खबदारी घेतली होती. पोलीस फोर्स वाढवून चोख बंदोबस्त लावला होता. प्रकल्प कायार्लायाच्या बाहेर बंदोबस्त लावण्यात आला होता. वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थांनी मोर्च्या दरम्यान करण्यात आलेल्या मागण्या, वसतिगृहात प्रवेश क्षमता वाढवून प्रवेशापासून वंचित राहणा-या आदिवासी विद्यार्थांना प्रवेश देण्यात यावा. ११.११.२०११ चा शासन निर्णय लागू करण्यात यावा. जव्हार येथील आदिवासी मुलांच्या नवीन वसतिगृहाची इमारत तात्काळ बदलण्यात यावी. मुलींच्या वसतिगृहात महिला गृहपालांची नेमणूक करावी. वसतिगृहातील भोजन ठेके आदिवासी महिला बचत गटांना द्यावेत. वसतिगृहातील मागील वर्षाची शिष्यवृत्ती देण्यात यावी. जुन्या वसतिगृहाची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी. पेसा कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी. जव्हार कुपोषण मुक्त करण्यासाठी निधीचा उपयोग योग्य करावा. बेरोजगारांना व्यवसायिक प्रशिक्षण देवून व्यवसायासाठी निधी द्यावा. भाडे तत्वावर चालू असणाऱ्या वसतिगृहाच्या इमारतींचे बांधकाम लवकरच चालू करण्यात यावे आदी मागण्या मोर्चेकऱ्यांनी केल्या त्या पूर्ण करण्याचे आश्वासन प्रकल्प अधिकारी- बाबासाहेब पारधे यांनी दिला आहे.
समस्या सोडविण्यासाठी, विद्यार्थांचा मोर्चा
By admin | Published: December 16, 2015 12:21 AM