पालघर : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश घेत आहेत. असे असले तरीही भाजपच्या कारभारावर नाराज असलेले अनेकजण काँग्रेसच्या संपर्कात आहेत. येत्या निवडणुकीत त्याची प्रचिती येईल, असे काँग्रेसचे जेष्ठ नेते मुजफ्फर हुसेन यांनी पालघर येथे सांगितले.
विधानसभेच्या येत्या निवडणुकीच्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यातील सर्व जागा लढवण्याचा दृष्टीने काँग्रेस पक्षाने सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. पालघर काँग्रेस कमिटीमध्ये हा कार्यक्र म पार पडला. यावेळी काँग्रेसचे कोकण विभागाचे प्रभारी बी.एम.संदीप, जिल्हाध्यक्ष दिवाकर पाटील, उपाध्यक्ष सिकंदर शेख, रुफी भुरे, मनीष गणोरे, रोशन पाटील, विक्रमगड तालुकाध्यक्ष घनश्याम आळशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
लोकशाही संपवण्याचा भाजपचा प्रयत्न असून आर्थिक व्यवस्था कोलमडल्याची अवस्था निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. नवीन जिल्हाध्यक्ष आणि इतर जिल्हा पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ यावेळी पार पडला. काँग्रेसचे कोकण विभागाचे प्रभारी बी.एम.संदीप, महाराष्ट्र काँग्रेसचे जेष्ठ नेते मुजफ्फर हुसेन यांनी नव्याने निवड झालेल्या पालघर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष दिवाकर पाटील, इतर पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि इतर घटक पक्षांची आघाडी जवळपास निश्चित असल्याचे ते म्हणाले.