उल्हासनगर : महापालिकेच्या ९ विशेष समिती सभापतीपदाच्या निवडणुका ७ आॅगस्ट रोजी होणार आहेत. त्यासाठी एकूण १३ अर्ज आले आहे. सर्वच समितीवर कब्जा करण्यासाठी शिवसेनेने काँग्रेसला सोबत घेवून त्यांच्या पदरात एक अथवा दोन सभापतीपद टाकण्याचे संकेत दिले आहेत. नियोजन तसेच विकास समिती सभापतीपदासाठी भाजपाच्या नीना नाथानी व काँग्रेसचे राजेश वधारिया, पाणीपुरवठा समितीसाठी शिवसेनेच्या ज्योती गायकवाड, काँग्रेसचे राजेश वधारिया, आणि राष्ट्रवादीचे सतरामदास जेसवाणी तसेच क्रीडा व समाजकल्याण समितीसाठी नरेंद्र दवणे यांचे अर्ज दाखल झाले आहेत.आरोग्य परिक्षण व वैद्यकिय समिती, शिक्षण समिती, महसूल समिती व सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदासाठी अनुक्रमे काँग्रेसच्या जया साधवानी, शिवसेनेचे विजय सुफाळे, समिधा कोरडे, भाजपाच्या मीना कौर लभाना व शिवसेनेचे सुरेश जाधव यांचेच अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड निश्चित समजली जात आहे. सर्वच्या सर्व विशेष समिती सभापती पदावर कब्जा करण्यासाठी सेना-भाजपा व रिपाइं महायुतीने काँग्रेसला सोबत घेतले आहे. प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपाने प्रभाग समिती क्र-४ वर पूर्ण बहुमत असतांना काँग्रेस पक्षाच्या मीना सोंडे यांना निवडून दिले आहे. त्याच प्रमाणे काँग्रेसच्या जया साधवाणी यांना आरोग्य समितीवर तर राजेश वधारिया यांना पाणीपुरवठा अथवा नियोजन व विकास समिती सभापती पदावर निवडून देण्यात येणार असल्याचे संकेत महायुतीकडून दिले जात आहेत. महापौरापदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी, साई व काँग्रेस पक्षाचे प्रत्येकी दोन नगरसेवक गैहजर राहिल्यानेच महापौरपदी शिवसेनेच्या अपेक्षा पाटील निवडून आल्या आहेत. त्यावेळी काँग्रेसच्या नगरसेविका जया साधवाणी व मीना सोंडे गैरहजर राहिल्याने त्याची परतफेड म्हणून सोंडे यांना प्रभाग समिती तर साधवाणी यांना आरोग्य समिती सभापतीपद दिल्याची चर्चा आहे. या अजब राजकारणाबाबत शहरात खमंग चर्चा सुरु आहे.(प्रतिनिधी)
विशेष समिती सभापती निवडणूक उद्या
By admin | Published: August 06, 2015 2:47 AM