विक्रमगड : जून महिन्यात सुरुवातीला कोसळल्यानंतर पावसाने बरेच दिवस दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. मात्र, जुलैच्या सुरुवातीपासूच दमदार बरसणा-या पावसामुळे विक्रमगड तालुक्यातील शेतकरी खूश झाले आहेत. तीनचार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी लावणीच्या कामांना सुरुवात केली आहे. मात्र, कोरोनाच्या भीतीने अनेक शेतक-यांना मजूरच मिळत नसल्याने शेतीच्या कामांना ब्रेक लागला आहे. वेळेत मजूरच न मिळाल्यास शेतलावणीची कामे रखडून रोपांचे नुकसान होण्याची चिंता शेतकरी व्यक्त करत आहेत.तालुक्यातील ९५ गावपाड्यांतून ८६ गावपाड्यांत ७५५८ हेक्टर क्षेत्रावर भातशेतीची लागवड करण्यात येते. दमदार पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. आदिवासी शेतकºयांनी पूर्वापार परंपरेप्रमाणे शेतावरील देवदेवतांना नैवेद्य दाखवून कामांना सुरुवात केली आहे. तालुक्यात आतापर्यंत विक्र मगड आणि तलवाडा सर्कलमध्ये ६२९.७८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. विक्रमगड तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे शेतीच्या कामांना मजूरच मिळत नाहीत. मजुरीच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. पुरुषांना ३०० रुपये, तर स्त्रियांना २०० रुपये मजुरी दिली जाते. विक्रमगड, डहाणू, वाडा, नाशिक या भागांत मजुरांसाठी शेतकºयांना वणवण करावी लागत आहे.जया, रत्ना, कोलम, गुजरात-११, सुवर्णा, कर्जत-३, मसुरी अशा विविध प्रकारच्या जातींच्या भाताचे उत्पन्न येथील शेतकरी घेतात. यंदा भातबियाणे, खते व मजुरीचे दर वाढल्याने शेती परवडत नसल्याची खंत शेतकºयांनी व्यक्त केली आहे. खते-बियाणे, मजुरीचा खर्चही वसूल होत नसल्याचे शेतकºयांनी सांगितले. काही शेतकरी अर्धलीने दुसºयांना करण्यास देत असल्याचे चित्र आहे.तालुका कृषी विभागाकडून गावपातळीवर सुधारित शेती करण्यासोबतच चारसूत्री लागवड करण्याचे आवाहन शेतकºयांना केले जात आहे. यासाठी कृषी विभागाचे कर्मचारी शेतकºयांना मार्गदर्शन करत आहेत. तसेच प्रत्येक तालुक्यात शासनाच्या कृषी विभागातर्फेभातावरील ज्या भागात पिकांवर रोग पडला असेल, त्या पिकांवरील रोगाचे निदान करून शेतकºयांना मार्गदर्शन केले जाणार आहे. काही गावांत गंध साफळे बसवण्यात येणार आहेत. वीज वितरण कंपनीचा सावळागोंधळ मात्र सुरूच आहे. नेहमीप्रमाणे वारंवार वीज खंडित होत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.तलासरीतही शेतीच्या कामांची लगबगतलासरी : तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर परिसरातील सर्वच गावपाड्यांमध्ये लावणीच्या कामांना वेग आला आहे. तालुक्यात ४२ महसुली गावे असून नऊ हजार ३९२ हेक्टर क्षेत्रामध्ये भाताची लागवड केली जाते. तालुक्यातील शेतकरी डांगी, कोलम, चार गुजरात, सुवर्णा, सुरती, सात गुजरात, जया, रत्ना, कर्जत, राशीपूनम, सुंदर इत्यादी हलवा, निमगरवा व गरवा या भाताच्या वाणांची लागवड करतात. उंबरगाव, भिलाड येथील काही मजूर मिळाले, तर जास्त मजुरी देऊनही घड्याळाचे काटे बघून काम होत आहे.त्यामुळे शेतकºयांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. दादरा-नगर-हवेली येथे औद्योगिकीकरणामुळे येथील मजूर कारखान्यात कामाला जातात. त्यामुळे भातशेतीसाठी मजुरांची टंचाई भासू लागली आहे. निसर्गाचा लहरीपणा, मजुरांचे वाढलेले दर, खताचे आणि यांत्रिक उपकरणाचे वाढलेले दर त्यामानाने भाताला भाव मिळत नसल्याने भातशेती करणे परवडत नाही, असे कुर्झे येथील शेतकरी शंकर भोये यांनी सांगितले.
पावसामुळे आला लावण्यांना वेग; मात्र मजूरटंचाईने कामांना ब्रेक , मजुरी वाढल्याने शेतकरी चिंतेत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2020 12:55 AM