वसई : अनधिकृत बांधकामांना कोर्टातून तांत्रिक बाबींवर मिळणारी स्थगिती टाळण्यासाठी वसई विरार महापालिकेने बिल्डरांना स्पीड पोस्टने नोटिसा पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर पंचनाम्याचे चित्रीकरण करून कोर्टात पुरावा म्हणून करण्या येणार आहे.वसई विरार परिसरातील अनधिकृत बांधकामांना नोटिसा बजावल्यानंतर त्यातील तांत्रिक त्रुटींचा फायदा उचलून कोर्टातून स्धगिती मिळवण्यात येते. त्यावर महापालिकेने हा नवा उपाय शोधून काढला आहे. नोटीस मिळालेली नाही, मुदतीत मिळाली नाही, असा कांगावा संबंधित बिल्डर कोर्टात करतात. नोटीस न स्वीकारणाऱ्या बिल्डरच्या बिल्डींगवर नोटीस चिकटवली जाते. तरीही नोटीस मिळाली नाही असा दावा करुन कोर्टातून स्थगिती मिळवतात. यावर उपाय म्हणून महापालिकेने स्पीड पोस्टने नोटिसा पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव यांनी आपल्या प्रभागात त्याची अंमलबजावणी सुरु देखील केली आहे. बिल्डींगवर नोटीस चिकटवतांनाचे व त्या स्पॉट पंचनाम्याचेही चित्रिकरण केले जाणार आहे. या सर्वांसह स्पीड पोस्टने पाठवण्यात आलेल्या नोटिशीच्या पोचपावतीचा वापर यांचा कोर्टात स्थगिती मिळवणाऱ्या बिल्डरांविरोधात केला जाणार आहे. महापालिकेने नोटीस बजावल्यानंतर ६५० प्रकरणात कोर्टाने स्थगिती दिली आहे. त्यापैकी ८२ स्थगिती उठवण्यात महाालिकेला यश आले आहे. (प्रतिनिधी)
अनधिकृत बांधकामांना स्पीड पोस्टने नोटिसा
By admin | Published: March 21, 2017 1:33 AM