नालासोपारा : मुंबई-अहमदाबाद दरम्यान एका लाख कोटी रुपये खर्च करून बुलेट ट्रेन साकारली जाते आहे. हे थोतांड असून, त्याची कुणालाही गरज नाही. त्यापेक्षा मुंबईकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेली लोकलसेवा सुधारण्यासाठी ते एक लाख कोटी रुपये खर्च करा आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी सिद्ध करा, असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी येथील जाहीर सभेत दिला.भाजपा सध्या वेगवेगळे मुखवटे मतांची भीक मागण्यासाठी नाचवित आहे. त्यातलाच एक मुखवटा पलीकडे भाषण करतो आहे, परंतु आम्ही मुखवटे नाचविणाऱ्यांची औलाद नाही, अशी टीकाही त्यांनी केली. त्या योगींच्या सभेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व्यासपीठावर होता. तिथे त्याला वंदन केले, परंतु पायात खडावा होत्या. एवढा माज आला आहे. उद्या जनतेने त्याच काढून हाणल्या, तर काय होईल तुमचे. आमच्या व्यासपीठावरील छत्रपतींचा पुतळा डेकोरेशनचा भाग नसतो, असा टोलाही त्यांनी हाणला.सर्व विरोधकांना आमनेसामने एका व्यासपीठावर येऊन चर्चा करण्याचे आव्हान त्यांनी दिले. आम्ही श्रीनिवासला आधार दिला. तर हे म्हणतात, आम्ही त्यांची माणसं फोडली. मग आता तुम्ही निरंजन डावखरेंना आपलसं केलं, ते काय आहे. तुम्ही करता ते राजकारण आणि आम्ही करतो ते काय गजकरण, असा सवाल त्यांनी केला. वसंत डावखरे यांना आमच्या रवी फाटकने पाडले, त्या आधीच्या निवडणुकीत ते शिवसेनाप्रमुखांकडे आले असता, त्यांना आम्ही बिनविरोध निवडून दिले. आम्ही शब्दाचे पक्के आहोत, असा दाखला त्यांनी दिला.
लोकलसेवा सुधारण्यासाठी बुलेट ट्रेनचे पैसे खर्च करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 1:17 AM