- वसंत भोईर, वाडा
पाण्यासाठी महाराष्ट्रभर वेगवेगळ्या योजना राबवून पाण्याचे स्त्रोत टिकविण्यासाठी शासन प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र वाडा तालुक्यात महसूल विभागाच्या डोळेझाक पणामुळे वैतरणा, तानसा व पिंजाळ नदीवर वाळूमाफियांनी अक्षरश: हैदोस घातला आहे. पावसाने उघडीप देताच तालुक्यातील पीक, मलवाडा या भागात वाळूमाफियांनी आपला अनिधकृत व्यवसाय पुन्हा सुरु केला आहे. या संपूर्ण प्रकाराकडे महसूल विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.तालुक्याला तब्बल चार नद्यांची निसर्गसंपदा लाभली असताना पिंजाळ, वैतरणा, तानसा व देहर्जे या चारही बारमाही नद्या सध्या वाळू तस्करीमुळे संकटात आहेत. तालुक्यातील पिंजाळ नदीवर पीक व मलवाडा या गावांजवळ काही वर्षांपूर्वी असणारा ७० ते ८० फुटांचा किनारा अवघ्या ३० ते ४० फुटांवर आला आहे. नदीतील नैसर्गिक झरे वाळूउपशाने बंद झाले असून पाणी वाहणे बंद झाल्यावर नदी एखाद्या फिशटँकप्रमाणे होऊन उन्हाळ्यात पाणी खराब व दुर्गंधीयुक्त होते. तसेच पाण्याची पातळीदेखील खालावते. या नदीवर पीक व मलवाडा येथे वर्षभर बेसुमार वाळूतस्करी केली जात असून पाऊस ओसरताच आता हे वाळूतस्कर पुन्हा सक्रि य झाले आहेत. असे राजरासपणे सुरु असताना वाडा महसूल विभाग मात्र आहे तरी कुठे? असा प्रश्न लोकांना पडला असून गेल्या अनेक वर्षांत महसूल विभाग कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याने वाड्यात दिवसरात्र रेतीउपसा व वाहतूक राजरोसपणे सुरु असते. पीक व मलवाडा हे वेगवेगळ्या तालुक्यात येत असल्याने विक्रमगड व वाडा तालुक्यातील महसूल विभाग एकमेकांवर बोटं दाखवून आपली जबाबदारी झटकतात असा ग्रामस्थांचा आरोप आहे. मात्र काहीही असले तरी पिंजाळ नदीपात्रात सुरु असणाऱ्या वाळूउपशावर तत्काळ बंदी आणून नदीला या तस्करांचा तावडीतून मुक्त करावे, अन्यथा येणाऱ्या काळात याबाबत ग्रामस्थ आंदोलन करतील, असा इशारा पीक गावातील ग्रामस्थांनी दिला आहे.सातत्याने सुरु असणाऱ्या उत्खननामुळे आमच्या नदीचे अस्तित्व संपुष्टात येणार असल्याने हा व्यवसाय आता पूर्णत: बंद व्हावा, अशी आम्हा ग्रामस्थांची मागणी असून थातूरमातूर कारवाई करून दिशाभूल करण्याचा उद्योग महसूल विभागाने बंद करावा. अन्यथा, याविरोधात आम्ही आमरण उपोषण करू.- मच्छिंद्र आगिवले, ग्रामस्थ, पीकआमच्या तलाठ्यांनी या भागातील रेती व्यवसायावर कारवाई करून काही माल ताब्यात घेतला असून या पुढेही कारवाई सुरूच राहील.- विठ्ठल गोसावी, नायब तहसीलदार,वाडा