अनिरुद्ध पाटील/ लोकमत न्यूज नेटवर्कबोर्डी : डहाणू नगर परिषद निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदार साक्षरता अभियान निवडणूक अधिकारी आँंचल गोयल यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आले आहे. रविवारी पारनाका समुद्रकिनारी त्यासंदर्भात साकारलेल्या वाळूशिल्पाला स्थानिक नागरिक व पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.नगर परिषदेसाठीचेमतदान १७ डिसेंबर रोजी आहे. या मध्ये २५ नगरसेवकांच्या जागेकरिता १०९ उमेदवार आणि थेट नगराध्यक्ष पदासाठी ७ उमेदवार रिंगणात असून या वेळी एकूण ३३ हजार ८२६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.या वेळी मतदानाचा टक्का जास्तीतजास्त वाढविण्यासाठी निवडणूक अधिकारी आंचल गोयल यांच्या संकल्पनेतून हा हटके फंडा वापरण्यात आला आहे. मतदान या वाळूशिल्पाच्या वरील भागात राज्य निवडणुक आयोगाचे नाव व सिम्बॉल असून बाजूला उजव्या हाताच्या तर्जनीच्या नखावर मतदान केल्याचे खूण असणारी शाई लावली आहे.या वेळी महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिक असे पाच चेहेरे मतदारांना मतदान करून लोकशाही मजबूत करण्याचे आवाहन करीत असल्याचे दाखविण्यात आले आहे.दरम्यान तालुक्यातील चिखले गावचे सुनील जोंधळेकर आणि दीपक डोंगरे या कलाकारांनी २२ फूट रु ंद आणि ७ फूट उंचीचे हे अप्रतिम वाळूशिल्प सुमारे पाच ब्रास वाळूतून साकारले आहे. त्यासाठी त्यांनी शनिवारी सकाळी १० वाजता प्रारंभ केला ते सायंकाळी सात वाजता पूर्णत्वास आले.त्यानंतर रविवारी सकाळपासून ते नागरिकांसाठी खुले करण्यात आले. या वाळूशिल्पाला स्थानिक नागरिक व परगावातील पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. मतदार साक्षरतेचा हा नवा फंडा या डहाणू नगर परिषदेच्या निवडणुकीत मतदार राजाला मोठ्याप्रमाणात मतदान केंद्रापर्यंत घेऊन येईल आणि मतदानाचा टक्का वाढेल असा विश्वास व्यक्त होत आहे. तर स्थानिक जनता या नव्या कल्पकतेचे सर्वत्र कौतुक करीत आहे.
मतदान साक्षरतेसाठी डहाणूत वाळूशिल्प, स्थानिक नागरिक व पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 5:58 AM