पालघर/बोर्डी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालघर येथील दांडेकर मैदानात शनिवार, 27 एप्रिल रोजी 3:45 वाजता शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्याकरिता प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी प्रतिस्पर्धी बहुजन विकास आघाडी या पक्षावर टीका करताना, या पक्षाचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या गुंड असा उल्लेख केला.
या शेवटच्या प्रचार सभेत बोलताना, शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी आमिषाला बळी न पडता, बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला प्रारंभ झाला, त्यांनी पालघरची ही सभा जिद्द आणि विचाराने पेटलेली असल्याचा उल्लेख केला. पक्ष नव्हे तर कंपनी असा बहुजन विकास आघाडीचा उल्लेख करताना, या मतदार संघातील त्यांची गुंडगिरी मोडीत काढणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांचा संपूर्ण रोख हितेंद्र ठाकूर यांच्यावर होता. तर त्यांचा उल्लेख उंदीर असा करून त्यांची शिकार करायला, वाघ नव्हे मांजरच हवी असेही ते म्हणाले. श्रीनिवास वनगाने ही जागा आताच लढविणार नसल्याचे सांगितल्याने, ती गावित यांना देण्यात आली. श्रीनिवास समजूतदार तर गावित निष्ठावान असल्याचे त्यांनी संबोधले. पोटनिवडणुकीत युतीला अधिक मतं मिळाल्याने बविआ तर्फे कोणीही उमेदवार लढण्यास तयार होईना, म्हणूनच त्यांची उमेदवारी घोषित होण्यास उशीर झाल्याचे टीकास्त्र सोडले.
वसई-विरार हा हरितपट्टा असून त्याला भूमाफियांमुळे कीड लागली असल्याचे सांगत, येथील सत्ताधाऱ्यांचा उल्लेख वाळवी म्हणून केला. तर ही कीड या भागाला पोखरून टाकत असल्याने तिला मतदानाचा फवारा मारून नष्ट करायचे असून युतीच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. येथील लोकसभा मतदारसंघ जिंकून त्यानंतर विधानसभा, महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना ताब्यात घ्यायचा मनसुबाही त्यांनी जाहीर केला. तर डहाणू ते विरार रेल्वेचे नियंत्रण गुजरात ऐवजी मुंबईत असावे अशी येथील डहाणू-वैतरणा प्रवासी संघटनेकडून मागणी होत आहे.
आजपर्यंत ती पूर्ण का झाले नाही. वसईतील 29 गावं वगळण्याचा शब्द दिला असून तो पूर्ण करणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. तर वाढवण बंदराबाबतच्या मुद्यावर बोलताना स्थानिकांच्या सहमतीशिवाय हे बंदर होणार नाही.जे नानार बाबत घडले तेच स्थानिकांच्या इच्छेनुसार वाढवण बाबतही घडेल असेही ते म्हणाले. श्रमाजीवीचे विवेक पंडित वसई- विरार येथील गुंडगिरीविरुद्ध एकट्याने लढा देत आहेत. त्यामुळे आमदार हितेंद्र ठाकूर यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे वारंवार गुंड म्हणून उल्लेख करण्यात आला. तर पालघर जिल्हा मुंबईच्या शेजारी असतानाही या भागात सेनेचे दुर्लक्ष झाल्याची कबुली त्यांनी भाषणातून दिली. मात्र गतवर्षी झालेल्या पोटनिवडणुकीपासून येथे लक्ष देण्यास सुरुवात केली असून यापुढे सातत्याने ते दिले जाईल असे त्यांनी सांगितले.