पालघर: केळव्या जवळील दांडा-खटाळी रस्त्याच्या दुरावस्थेकडे जिल्हापरिषद बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधी कडून दुर्लक्ष होत असल्याचा फटका सर्वसामान्यांना बसत असून शनिवारी एसटी कलंडली. मात्र चालक आणि स्थानिकांनी केलेल्या मदतीमुळे प्रवाशांना सुखरूप बाहेर काढता आले.तालुक्यातील एडवन, कोरे, तर अहमदाबाद-मुंबई मार्गा वरील वरई फाट्याला जोडणारा शॉर्टकट रस्ता म्हणून दांडा-खटाळी ह्या रस्त्याकडे पाहिले जाते. केळवे ह्या निसर्गरम्य पर्यटन स्थळाला ठाणे, मुंबई येथील पर्यटक भेटी देतांना ह्याच मार्गाचा अवलंब करीत असतात. ह्या रस्त्यासाठी जिल्हा परिषदेचा ७० लाखाचा निधी मंजूर असून स्थानिक आमदारांनी या कामाचे भूमिपूजन ही केले होते. मात्र अजूनही त्याला मुहूर्त सापडत नसल्याने हा रस्ता अनेक वर्षा पासून दुरावस्थेत आहे. त्यावरील भराव वाहून गेल्याने मोठमोठे खड्डे त्यावर पडले आहेत.सफाळे-दांडा खटाळी ही बस काल दांडा भागाकडे जात असतांना समोरून आलेल्या एका वाहनाला साईड देतांना रस्त्याकडेच्या चिखलात रु तली आणि एका बाजूला कलंडली. ती पडणार अशी परिस्थिती निर्माण झाली असतांना वाहकाच्या प्रसंगावधनाने प्रवासी वाचले. स्थानिकांनी तात्काळ मदतकार्य करून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. मागील १०-१२ वर्षांपासून स्थानिक ग्रामपंचायत ह्या रस्त्याच्या दुरावस्थे बाबत तक्र ारी करीत असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे रमेश बारी ह्या पर्यटन व्यावसायिकानी सांगितले. जिल्हापरिषदेचे नवनियुक्त बांधकाम सभापती दामोदर पाटील ह्यांनी ह्या रस्त्याच्या उभारणी कडे लक्ष द्यावे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
रस्त्याच्या कडेला एसटी कलंडली, प्रवासी सुखरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 12:01 AM