जव्हार : येथील एसटी स्थानकात वनवासीला जाणाऱ्या एसटीत अॅसिड सांडल्यामुळे खचाखच भरलेल्या बसमध्ये धुरु निघुन उग्रवास पसरल्याने प्रवाशांची पळापळ झाली. कुणी खिडकीतुन तर कुणी आपत्कालिन मार्गिकेतुन उड्या मारल्या. या चेंगराचेंगरीमध्ये गुदमरलेल्या दोघांना येथील किंग पतंगशहा कुटीर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.जव्हार डेपोची एसटी बस क्र मांक (एम.एच.०६ एम ८७४५) ही बस दुपारनंतर मोर्चापाडा येथे जावून आल्यानंतर ४ वाजेची हिच बस वनवासीला जाणार म्हणून एसटी बसस्थानकात लावण्यात आली होती.या बसमध्ये जवळपास १०० हून अधिक प्रवाशी बसले होते. संपूर्ण बस गच्च भरली होती. याच बसमध्ये जखमी झालेले शुभांगी मराड (१८) व दिनेश भोगाडे (२०) हा तरु ण त्याच सीटजवळ बसला होता.मात्र ज्या ठिकाणी शुभांगी मराड बसली होती. त्या ठिकाणी सीटच्या खाली पाण्याने भरलेली बॉटल म्हणून तिने उचलली मात्र, तीमध्ये अॅसिड होते. ती बाटली तिने उचलताच त्यातील अॅसिड खाली सांडले व त्यानंतर गाडीमध्ये धुरच धूर होऊन प्रवाशांची पळापळ सुरु झाली. उग्रवास व अती गर्दीमुळे घाबरलेल्या प्रवाशांनी मिळेल त्या मार्गाने बस बाहेर उड्या मारल्या. या धावपळीमध्ये दोघे प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जव्हारच्या बसस्थानकात घडलेल्या घटनेची नोंद जव्हार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
एसटीमध्ये अॅसिड सांडल्याने चेंगराचेंगरी, दोन प्रवाशी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 11:40 PM