खर्डी : मरणाच्या दारात टाकून दिलेल्या निष्पाप अनाथांच्या पाठीशी समाजाने खंबीरपणे उभे राहायला हवे, असे आवाहन अनाथांची माई सिंधुताई सकपाळ यांनी खर्डी येथे शनिवारी केले.फिरते ज्ञान प्रसारक मंडळाच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त तीनदिवसीय महोत्सवाला प्रारंभ झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. माजी आमदार पांडुरंग बरोरा, शिवसेना ठाणे जिल्हा उपसंपर्कप्रमुख संतोष शिंदे, शिवसेना नेते विठ्ठल भेरे, भाजपचे अशोक इरनक, कसारा-कर्जत-कल्याण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव, प्रमोद जगताप, एकनाथ महाराज मांजे, पप्पूशेठ मिश्रा, बबन हरणे आदी उपस्थित होते.सिंधुतार्इंनी जीवनात कसा संघर्ष केला, हे सांगितले. त्यांच्यावर झालेल्या अन्यायातून स्वत:ला सावरत समाजाने मरणाच्या दारात टाकून दिलेल्या निष्पाप जीवांना जीवदान देऊन त्यांना समाजात मानाने जगण्यासाठी आधार देण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. आजही मी गावागावांत फिरते.मी परदेशातही जाऊन आले. अनाथांसाठी चालवत असलेल्या माझ्या संस्थेला सरकारचे कुठलेही अनुदान अथवा मदत मिळत नसल्याने परवड होत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मला आजही समाजाकडे जाऊन मदतीसाठी झोळी पसरावी लागते. अनाथांसाठी माझा संघर्ष यापुुुुढेही सुरूच राहील, असे त्या म्हणाल्या.४७ वर्षांपूर्वी मी रेल्वेत भीक मागत असताना माझ्याकडे तिकीट नसल्याने मला टीसीने खर्डी स्थानकावर उतरविले होते. त्यावेळी मी तीन दिवस खर्डी गावात भीक मागून खात होते, अशी आठवण त्यांनी सांगितली. त्यावेळी मला भुकेची एकादशी भोवली होती, मात्र आज एकादशी महोत्सवात माझा सन्मान याच खर्डी गावात होत आहे, यासारखा आनंद नाही. या कार्यक्र मात समाजोपयोगी कार्य करणाºया मान्यवरांचा गौरव सकपाळ यांच्या हस्ते करण्यात आला.
अनाथांच्या पाठीशी उभे राहावे- सिंधुताई सकपाळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2020 12:31 AM