मीरारोड - मीरा भाईंदर भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार नरेंद्र मेहता यांचे समर्थक किशोर शर्मा यांनी पक्ष निर्देश व प्रमुख पदाधिकाऱ्यांना डावलून परस्पर केलेल्या मंडळ अध्यक्ष नियुक्ती मुळे भाजपा प्रदेश नेतृत्व नाराज झाले आहे. त्यातूनच प्रदेश नेतृत्वाने शर्मा यांनी नेमलेल्या मंडळ अध्यक्षांच्या नियुक्तीला स्थगिती देऊन मनमानी नियुक्त्यास दिलेली चपराक मानली जात आहे. मीरा भाईंदर भाजपमध्ये आमदार गीता जैन, मीरा भाईंदर विधानसभा निवडणूक प्रमुख एड. रवी व्यास व माजी आमदार नरेंद्र मेहता असे तीन गट असल्याची चर्चा आहे. मेहतांच्या विधानसभा निवडणुकीतील पराभव तसेच त्यांच्यावर दाखल विविध गुन्हे , होणारे आरोप यामुळे पक्षाची प्रतिमा डागाळत असल्याचे आरोप होत आले . त्यातूनच तत्कालीन जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांच्या पुनर्नियुक्ती नंतर पक्ष नेतृत्वाने ऍड. व्यास यांना जिल्हाध्यक्ष नेमले . मेहता व त्यांच्या समर्थकांनी पक्ष नेतृत्वाच्या निर्णयास विरोध करत शक्ती प्रदर्शन केले तरी पक्षाने निर्णय बदलला नाही.
व्यास यांना विधानसभा निवडणूक प्रमुख केल्या नंतर जिल्हाध्यक्ष पदी किशोर शर्मा यांची नियुक्ती झाली. शर्मा हे मेहता समर्थक म्हणून ओळखले जात असल्याने मेहतांनी एड. व्यास व आ. जैन यांना दिलेला धक्का मानला जाऊ लागला. तर ज्या किशोर शर्मा यांना पक्षविरोधात कारवाया केल्याबद्दल जिल्हाध्यक्ष असताना नरेंद्र मेहता यांनी पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबित केले होते त्याच शर्मांच्या हातात जिल्हाध्यक्ष पद मिळाल्याबद्दल मेहता व त्यांचे समर्थक त्यांचे कौतुक करत असल्याचे पाहून भाजपातूनच आश्चर्य व्यक्त होत होते.
परंतु पक्ष नेतृत्वाने पदाधिकारी नियुक्त करताना शर्मा यांनी केवळ मेहता यांच्या सांगण्यावरून त्यांच्याच समर्थकांनाच घेऊ नये व ऍड . व्यास यांच्या सोबतच्या कार्यकर्त्यांना सुद्धा सामावून घ्यावे असे शर्मा यांना सूचित केल्याची चर्चा होती . त्यानुसार शर्मा यांच्या जिल्हा कार्यकारणीत व्यास समर्थकांची सुद्धा नावे दिसली. परंतु पक्ष संघटनेत महत्वाच्या असलेल्या मंडळ अध्यक्ष यांच्या नियुक्त्यां वरून मात्र किशोर शर्मा वादात सापडले आहेत . शर्मा यांनी १० मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या होत्या. त्या नियुक्त्यांना आता थेट प्रदेश सचिव विक्रांत पाटील यांनी एका पत्राने स्थगिती दिली आहे.
जिल्हा अंतर्गत मंडळ अध्यक्ष नियुक्ती करिता एक प्रक्रिया संघटनेने निश्चित करून दिली होती. त्यानुसार सर्वांशी चर्चा करून उपलब्ध सर्व सक्षम पर्यायांचा विचार करून, प्रभारी यांच्याशी चर्चा करून व संघटन मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त्या होणे अपेक्षित होते. परंतु विहित प्रक्रियेचे पालन न करता मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या झाल्याचे निदर्शनास आल्या. पुढील अधिकृत मंडळ अध्यक्ष यांची घोषणा होई पर्यंत त्यास स्थगिती देण्यात आली असल्याचे पत्रात स्पष्ट केले आहे.