- आशिष राणे वसई - ई फेरफार संगणक प्रणालीचे राज्य समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी, पुणे रामदास जगताप यांच्या विरोधात गेल्या १५ दिवसांपासून राज्यातील संबंध तलाठी व मंडळ अधिकारी संघटनांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे तलाठी सजातील सात-बारा उतारे, फेरफार, बोजा नोंदीचे काम, विद्यार्थ्यांना लागणारे उत्पन्नाचे दाखले, ई पीक पाहणी आदी सर्व महसूली कामे ठप्प वजा बंद आहेत.
महसूल कामकाजांचा महत्वाचा दुवा असलेल्या तलाठ्याने काम बंद आंदोलन केल्याने नैसर्गिक आपत्ती व निवडणूक विभागाची अशी केवळ दोन कामे वगळता सर्व कामे ठप्प झाली आहेत.एका बाजूला शासन म्हणतं गतिमान महसूल प्रशासन व दुसऱ्या बाजूला राज्यातील सर्व तलाठी कार्यालये ओस पडल्यानं सर्वसामान्य वर्गासहित नागरिक व शेतकरी खातेदारातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
राज्याचे समन्वय, ई- महाभूमी प्रकल्प अधिकारी रामदास जगताप यांनी आपल्या शासकीय सोशल मीडिया ग्रुपवर तलाठी व मंडळ अधिकारी यांना उद्देशून अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ दि.१२ ऑक्टोंबर पासून राज्यभर काम बंद आंदोलन सुरू आहे. जो पर्यंत उपजिल्हाधिकारी जगताप यांची तिथुन बदली होत नाही तो पर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा पावित्रा राज्यातील तलाठी संघटनेने घेतल्याने शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक फटका सहन करावा लागत आहे. तर तालुक्यातील त्या त्या तहसीलदाराकडे गेल्या १५ दिवसांपूर्वीच (डी ए सी) म्हणजेच डिजिटल सिग्नेचर प्रणाली तलाठी व मंडळ अधिकारी यांनी जमा केल्या आहेत. यामुळे तालुक्यातील प्रचंड कामे खोळंबली आहेत.
राज्यात तलाठी आणि मंडळ अधिकारी या आंदोलनावर ठाम आहेत त्यातच नैसर्गिक आपत्ती व निवडणुक अशी केवळ दोनच कामे वगळता इतर सर्व कामांवर राज्यातील तलाठ्यांनी बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील गावगाड्याचे कामकाज ठप्प झाले आहे.आणि सरकार तर्फे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात देखील याबाबत लक्ष घालीत नाही हे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे हे आंदोलन अजूनही चिघळले असून या आंदोलनात राज्याचे जमाबंदी आयुक्तालयातील समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांना आता बदली नाही तर निलंबितच करावे, अशी तलाठी संघाची ठाम मागणी राहिली आहे. या संदर्भात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना वारंवार संपर्क केला असता तो झाला नाही त्यामुळे सरकार तर्फे लोकमत ला त्यांची भूमिका समजली नाही
काय आहे नेमके प्रकरण?महाराष्ट्र राज्य तलाठी व मंडळ अधिकारी संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर डुबल (आप्पा) यांनी राज्यातील सध्याची नैसर्गिक आपत्ती, ई- पीक पाहणी आणि मोफत सातबारा खातेदारांना वितरण याबाबत दि. ५ ऑक्टोबर रोजी मार्गदर्शन मिळावे यासाठी त्यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवर मेसेज पाठविला होता.हा संदेश प्राप्त झाल्यावर मार्गदर्शन न करता मूर्खासारखे मेसेज पाठवू नका, असा उलट संदेश श्री.जगताप यांनी ग्रुपवर पाठवल्याने मंडळ अधिकारी व तलाठी यांचा अपमान झाल्याचे म्हणणे तलाठी संघाचे आहे. आणि यानुसार मागील अनेक दिवसांपासून निषेध, असहकार व त्यानंतर कामबंद आंदोलन राज्यभर सुरू आहे.
तलाठी संघाचा राज्यभर संप सुरू असल्याने शेतकरी सामान्य जनतेचे हाल होत आहेत हे मान्य असून चर्चेअंती हा संप लवकरच मिटेल. पदाधिकाऱ्यांनी चार दिवसांपूर्वी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली आहे. त्यातच मंत्रालयातील वरिष्ठ सचीव यांचीही भेट घेतली आहे. आज रविवारी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष यांच्याशी चर्चा करून हा संप मिटवण्यात येईल, असे ज्ञानदेव डुबल (आप्पा) जि.सातारा अध्यक्ष: महाराष्ट्र राज्य तलाठी संघ यांनी सांगितले.