मीरा रोड/भाईंदर : मीरा भार्इंदर शहराचे प्रवेशद्वार असलेल्या काशिमीरा नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा हटवण्याचा घाट सत्ताधारी भाजपने घातल्याच्या चर्चेमुळे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने बुधवारी आयुक्तांची भेट घेतली. महाराजांचा पुतळा हटवण्याचे मनसुबे कोणत्याही स्थितीत शिवसेना हाणून पाडेल असा इशारा आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला.
आयुक्त चंद्रकांत डांगे यांची सरनाईक, विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील, सभापती तारा घरत, गटनेते हरिश्चंद्र आमगावकर, नगरसेविका निलम ढवण, राजू भोईर, स्नेहा पांडे, संध्या पाटील, वंदना पाटील, कुसूम गुप्ता, दिनेश नलावडे, अर्चना कदम, कमलेश भोईर, दीप्ती भट, भावना भोईर, शर्मिला बगाजी, हेलन गोविंद तसेच पदाधिकारी प्रभाकर म्हात्रे, स्नेहल सावंत, विक्र म प्रतापसिंग, शुभांगी कोटीयन, पप्पू भिसे, श्रेया साळवी आदी उपस्थित होते.महाराजांचा काशिमीरा येथील अश्वारूढ पुतळा मेट्रोच्या कामामुळे घोडबंदर येथे हलवण्यात येण्याचा विचार व हालचाली सत्ताधारी भाजप करत असल्याचे बोलले जाते. मात्र महाराजांचा काशिमीरा येथील पुतळा कुठल्याही परिस्थितीत तेथून स्थलांतरीत करण्याचा विचार कुणीही करू नये. असा विचार केला तर त्याला शिवसेनेच्या रूद्रावताराला सामोरे जावे लागेल असा इशारा त्यांनी दिला. काशिमीरा नाका येथून शहरात मेट्रो येणार आहे. मेट्रो व उन्नत मार्गाचे काम सुरू आहे. याठिकाणी असलेल्या महाराजांचा पुतळा तेथेच कायम ठेवावा व महाराजांच्या पुतळ््याची उंची किमान २५ फुटांनी वाढवावी. पुतळ््याची उंची वाढवून त्याचे सुशोभीकरण करावे. घोडबंदर किल्ला सुशोभीकरण करत असताना किल्ल्यात महाराजांचा नवीन पुतळा बसवावा असे सरनाईक यांनी सांगितले.