नालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील संतोष भवन परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या पेट्रोल पंपावर लाखोंची चोरी झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली आहे. या चोरीमुळे पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून चोरांना कायद्याचा धाक उरला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तुळींज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
संतोष भवन परिसरातील मुख्य रस्त्यावर इंडियन आॅइल नावाचा पेट्रोल पंप आहे. रविवारी मध्यरात्री चोरांनी पंपाच्या कार्यालयाच्या मागच्या दिशेने जाऊन खिडकीची ग्रील तोडून तिजोरीत ठेवलेले ११ लाख २२ हजार रु पयांची रोख रक्कम चोरी करून पसार झाले आहे.
पंपाच्या आजूबाजूला सीसीटीव्ही लागलेले असून या चोरांनी रेकॉर्डिंग झालेला डिव्हायडर सुद्धा चोरी करून नेला असल्याने पोलिसांना कोणताही धागादोरा किंवा पुरावा ठेवलेला नाही. आता तुळींज पोलिसांसमोर या गुन्ह्याचा छडा लावून चोरांना अटक करण्याचे मोठे आव्हान उभे टाकले आहे.या पेट्रोल पंपावर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मालकाने कोणतीही काळजी का घेतले नसल्याची चर्चा सुरू असून रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षक नेमले होते तर ते कुठे होते? इतकी मोठी रक्कम का ठेवण्यात आली होती? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.
पेट्रोल पंपावर दोन दिवसांची रोख रक्कम जमा होती. सोमवारी ही रक्कम बँकेत जमा करणार होतो.- पवन सिंग (मॅनेजर, पेट्रोल पंप)